अल्पवयीनवर पती-सासर्‍याचा बलात्कार

0

आळंदी : कायदा धाब्यावर बसवून 14 वर्षाच्या मुलीशी बळजबरीने लग्न करून नंतर तिच्यावर बलात्कार करणार्‍या पिता-पुत्रास पोलिसांनी गजाआड केले आहे. मुलीचा पती आणि सासरा या दोघांनाही आळंदी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता, दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश देण्यात आले. पती अविनाश तुकाराम शिंदे (वय 22) व सासरा तुकाराम देवराम शिंदे (वय 69, दोघेही रा. नाकोडा मंदिर जवळ, आळंदी, मूळगाव उंचेगाव, ता. हातगांव, जिल्हा नांदेड) अशी त्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलीने आळंदी पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक डी. एल. शिंदे यांनी दिली.

नांदेड पोलिसांकडे गुन्हा वर्ग
हे तिघेही एकाच घराच राहतात. सासरा तुकाराम याने घरात कोणी नसताना तिच्यावर बलात्कार केला. तसेच या बाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, पतीने ती अल्पवयीन असतानाही तिच्यावर 28 जून ते 16 जुलै 2017 या कालावधीत वेळोवेळी बलात्कार केला. आळंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक डी. एल. शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अरुण भोसले यांनी आरोपी पिता पुत्राला अटक करून खेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात केली. पीडित मुलगी अल्पवयीन असताना तिच्या आई-वडिलांनी नांदेड येथे तिचा विवाह लावून दिला. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 कलम 9,10,11 नुसार आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून शून्य क्रमांकाने हा गुन्हा नांदेड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.