अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणार्‍या पोलिसाचे अखेर निलंबन

0

पीडीतेच्या भावास ठार मारण्याची धमकी देत केले कृत्य ; न्यायालयाने सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

जळगाव- भावाला ठार मारण्याची धमकी देत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरच पोलिस दलातील नाईकाने अत्याचार केल्याची माणुसकीला तसेच पोलिस दलाच्या प्रतिमेला तडा गेल्याची घटना जळगावात घडली होती. या प्रकरणी संशयीत आरोपी तथा पोलिस दलातील नाईक व कराटे व स्केटिंगचा कोच विनोद अहिरे याच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यास 2 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर आरोपी पोलिसाचे सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी निलंबन केले आहे.

धमकी देत केला अत्याचार
पीडीत तरुण जळगाव पोलिस मुख्यालयातील कराटे प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी आल्यानंतर आरोपीने तिच्याशी सलगी वाढवत दक्षतानगर येथील बिल्डिंग क्रमांक एकमधील वरच्या मजल्यावरील खोलीत तसेच जळगाव रस्त्यावरील एका लॉजमध्ये तसेच पीडीतेच्या मावशीकडेदेखील अत्याचार केला शिवाय याबाबत कुठे वाचत्या केल्यास भावास जीवे ठार मारेल, आपण पोलिस असल्याने काहीही करू शकतो, अशी धमकीही दिली होती. सातत्याने होत असलेल्या अत्याचारानंतर पीडीतेने कुटुंबियांना घटना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्याकडे रविवारी कैफियत मांडली. त्यांनी तक्रारीची तातडीने दखल घेत आरोपी कर्मचार्‍याला कामानिमित्त दालनात बोलावले व अधीक्षकांच्या दालनातच आरोपीच्या अंगातून पोलिसाचा गणवेश उतरवण्यात आला. खाजगी गणवेश परीधान केल्यानंतर पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी आरोपीस अटक केली तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख यांनी पीडीतेचा जवाब नोंदवून घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्रीच पीडीता व संशयित विनोद यांची वैद्यकीय तपासणी केली.

आरोपीचा मोबाईल जप्त ; 2 नोव्हेंबरपर्यंत कोठडी
आरोपीला सोमवारी जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास 2 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईलदेखील जप्त केला असून तो गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा ठरणार आहे शिवाय पीडीतेने दाखल केलेल्या तक्रारीअन्वये पोलिस आता यापुढील गुन्ह्याचा तपास करणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने तक्रारीची दखल घेत आरोपीचे निलंबन केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड अधिक तपास करीत आहेत.