अल्पवयीन तरुणीस पळवले ; निंभोर्‍याच्या आरोपीस तीन वर्ष शिक्षा

0

भुसावळ- अल्पवयीन तरुणीस बळजबरीने पळवून नेल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील निंभोरा येथील कृष्णा काशिनाथ सोनवणे या आरोपीस भुसावळ सत्र न्यायालयाचे न्या.आर.आर.भागवत यांनी तीन वर्ष सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. निंभोरा गावातील अल्पवयीन तरुणीस आरोपी 11 सप्टेंबर 2012 रोजी बळजबरीने पळवून नेत पीडीतेने लग्न न केल्यास तिच्या वडीलांचा खून करण्याची धमकीही दिली होती. पीडीतेला जळगाव, रावेर, बर्‍हाणपूर, निंबोला व नंतर खापरखेडा येथील आत्याकडे आणण्यात आले. पीडीतेच्या वडीलांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर आरोपीच्या मेहुण्यांसह तिच्या आतेभावाने पीडीतेला निंभोरा पोलिसात हजर केले होते. पीडीतेने यावेळी पोलिसात 13 सप्टेंबर 2012 रोजी तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भुसावळ न्यायायात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर कलम 363 अन्वये तीन वर्ष सक्तमजुरी तसेच 15 हजार रुपये दंडाची शिक्षा आरोपीस सुनावण्यात आली. या प्रकरणात आठ साक्षीदार तपासण्यात आले. पीडीतेसह आरोपीचे मेहुणे, आतेभाऊ तसेच मुख्याध्यापकाची साक्ष महत्वाची ठरली. सरकारतर्फे सहा सरकारी वकील अ‍ॅड.पी.पी भोंबे यांनी युक्तीवाद केला तर आरोपीतर्फे अ‍ॅड.प्रफुल्ल आर.पाटील यांनी काम पाहिले.