अल्पवयीन तरूणीस त्रास देणार्‍यास अटक करा

0

धुळे । शहरातील चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या एका अल्पवयीन युवतीस त्रास देणार्‍या नदीम शेखवर कारवाई करावी. यासाठी आज सदर युवतीच्या परिवारातील लोकांसह परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेत निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, जामचा मळा, सुलतानिया मदरसाजवळ रहाणार्‍या एका 17 वर्षीय युवतीची त्याच भागातील नदीम गनी शेख हा नेहमी छेड काढायचा. 1 सप्टेंबर रोजी नदीमने या युवतीस रस्त्यात एकटे गाठून तीच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट युवतीने चुलत भाऊ अन्सारू यास सांगितले असता त्याने नदीमला विचारणा केली. त्यावेळी नदीमचे त्यालाही शिवीगाळ करून लाकडी बॅटने मारहाण केली.

नशेत केली शिवीगाळ
याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार केली असता त्याच्यावर गुन्हा दाखल होवून त्याला अटक झाली. शिवाय तो एक महिन्यासाठी जेलमध्येही जावून आला. त्यानंतर 19 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता नदीमने दारूच्या नशेत सदर युवतीच्या घरी जावून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. अंगावर अ‍ॅसिड फेकण्याचीही धमकी यावेळी देण्यात आली. त्यामुळे सदर युवती घाबरली असून नदीम शेखचा बंदोबस्त करावा, अशी मागणी तीने केली आहे. तीच्या या मागणीचे निवेदन तीचे वडील जलील शेख यांच्यासह शहाबुद्दीन शेख, ताहीर शेख, आफिस शेख, अनसारूल शेख, लाले शाह, वाजीद खान यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे.