यावल : तालुक्यातील कोरपावली येथील 17 वर्षीय मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेत जावून येतो असे सांगून गेलेल्या मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याने संशयीताचा शोध सुरू करण्यात आला आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
आमीन सिकंदर तडवी (17, कोरपावली, ता.यावल) हा मुलगा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. शुक्रवार, 3 जून रोजी सकाळी नऊ वाजता यावल येथे शाळेत जावून येतो, असे सांगून अमीन घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत तो घरी न आल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली. त्याचा यावल शहरातील शाळेत, मित्र आणि नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु आमीन हा कुठेही आढळून आला नाही. अखेर शनिवार, 4 जून रोजी रात्री त्याची आई आशा तडवी यांनी यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय देवरे करीत आहे.