जळगाव। शहरातील समता नगरमधील अल्पवयीन मुलींना अमिष दाखवुन तसेच फुस लावुन पळवून घेण्याच्या घटनेत वाढ झाली असून यामुळे पालक हतबल झाले आहेत. काही पालक धास्ती घेऊन आजारीग्रस्त झाले आहेत. गॅँगच्या माध्यमातून मुली पळविण्याचा सुरू असलेला फंडा स लगाम घालावा, अशी आर्त हाक बुधवारी अनेक पालकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात दिली.
पोलिसात हरविल्याची नोंद
गेल्या दोन महिन्यात यापरिसरातून चार अल्पवयीन मुलींना पळवून नेले आहे. याप्रकरणी पालकांनी हरविल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली परंतु त्यातून परिणामकारक रिझल्ट मिळत नसल्याने फुस लावून पळवून नेणार्या टवाळ मुलांची हिंमत वाढली आहे, त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे, अशी भूमिका काही सुज्ञ पालकांनी येथे बोलताना व्यक्त केली. मुलींना पळवून नेल्यानंतर तिच्या जीवनाशी संशयीत खेळतात, असा आरोप पालकांनी केला.
गांभीर्याने दखल घ्या..
मुली पळविण्याकामी परिसरात गॅँग सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती पालकांनी दिली. अल्पवयीन मुलीस अमिष दाखविणे, नंतर तिचा विश्वास संपादन करणे, मग तिचा विश्वासघात करणे अशा पध्दतीने हा गैरप्रकार सुरू असल्याने अनेक पालक काळजीतून आजारीग्रस्त झाले आहेत. पिडीत मुलीचे कुटुंबिय पोलीसात तक्रार करतात, पण त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, असा आरोप काही पालकांनी यावेळी केला.
तपास होत नाही
अल्पवयीन मुलीस कुठे पळवून नेले? याची इंत्यभूत माहिती दिल्यावरदेखील तपास पुढे सरकत नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली. गुंडागर्दीने आणि जातीआड लपून दबाबतंत्राचा वापर करून अशी गैरकृत्य होत असल्याचा आरोप पालकांनी करून हा प्रकार तत्काळ रोखला जावा ,अशी विनंती केली.
हा गंभीर विषय असून यामुळे अनेक कुटुंब उध्दवस्त होऊन त्यातून वाताहत होत असल्याचा दर्ददेखील पालकांनी मांडला. हा प्रकार न थांबल्यास सामाजिक उद्रेक होण्याची भिती काही पालकांनी व्यक्त केली. तसेच या घटनांना आळा बसवा यासाठी पोलिस प्रशासनाने काही तरी करावे असे मागणीही पालकांनी केली.