अल्पवयीन मुलीचा विनयभंग; 3 वर्षाची सक्तमजुरी

0

जळगाव। तालुक्यातील शिरसोली प्र.न येथील 13 वर्षीय मुलीचा तरूणाने विनयभंग केला होता. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात मंगळवारी न्या.दरेकर यांनी विनयभंग करणार्‍या तरूणाला 3 वर्षाची शिक्षा व 5 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

शिरसोली प्र.न. येथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा रविंद्र माधवराव सांबळे (रा. शिरसोली) या तरूणाने विनयभंग केला होता. यानंतर पिडीत मुलींच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरूणाविरूध्द भादवि कलम 354, 448,506 व पोक्सो 7 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर रविंद्र साबळे याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर खटला न्यायाधीश ज्योती दरेकर याच्या न्यायालयात चालला. दरम्यान, याप्रकरणी सरकारपक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत मुलगी, तिचे आई-वडील, पंच, साक्षीदार, तपासअधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक अश्यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या.

अशी सुनावली शिक्षा
13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मंगळवारी न्यायाधीश ज्योती दरेकर यांनी निकाल दिला आहे. त्यात आरोपी रविद्र साबळे याला 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्यात भादवि कलम 354 नुसार 3 वर्ष सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद, भादवि कलम 448 प्रमाणे 1 वर्षे सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद, कलम 506 प्रमाणे 6 महिने सक्तमजुरी व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तर ही शिक्षा एकत्र भोगावयाची आहे. तर एकूण 5 हजार 500 रुपयांच्या दंडापैकी 5 हजार रुपये पिडीत मुलीस नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. शिला गोडंबे यांनी तर फिर्यादीतर्फे अशोक महाजन यांनी कामकाज पाहिले.