जिल्हा न्यायालयाचा निकाल ; पिडीतेला दंडापैकी 4 हजार देण्याचे आदेश
जळगाव : पाणी पिण्याचा बहाना करून घरात शिरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथे घडली होती. या खटल्यात आरोपी गोपाळ भिमराव कापसे वय 24 यास दोषी धरून न्यायालयाने तीन वर्षाचा सश्रम कारावास तसेच चार हजार 500 रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायालयाचे न्या. जे.पी.दरेकर यांनी हा निकाल दिला.
न्हावे 22 मे 2015 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी एकटी असताना गोपाळ कापसे (24) याने पाणी पिण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला. पिडीत समाजाची असल्याचे माहीत असून देखील संशयीताने तिचा विनयभंग करत लज्जास्पद कृत्य केले. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुरन 43/15 भादवी कलम 452, बालकांचे लैगींक अत्याचारापासून संरक्षण कलम 7 व 8 तसेच अनुसुचित जाती जमाती कायदा कलम 3(1) (11) खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपअधिक्षक केशव पातोंड यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
तिघांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
न्या. जे.पी.दरेकर यांच्या न्यायालयात या खटल्याच्या चौकशीच्या कामकाजात पिडीत मुलगी तसेच तिची आई, तपासाधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. युक्तीवादाअंती न्यायालयाने कलम भादवी 354 अन्वये आरोपी गोपाळ कापसे यास दोषी धरून तीन वर्षाचा सश्रम कारावास तसेच एक हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. भादवी कलम 452 अंतर्गत दोषी धरून एक वर्षाचा सश्रम कारावास तसेच पाचशे रूपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवसांची साधी कैद, बालकांचे लैगींक अत्याचारापासून संरक्षण कलम 8 अंतर्गत दोषी धरून तीन वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद, अनुसचित जाती जमाती कायदा कलम 3 (1) (11) अंतर्गत दोषी धरून दोन वर्ष सश्रम कारावास व रूपये दोन हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद तसेच पिडीत मुलीस एकूण दंडाच्या रक्कमेपैसी रूपये चार हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश केले. खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. शिला गोडंबे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी देवीदास कोळी यांचे सहकार्य लाभले.