अल्पवयीन मुलीला घेवून रफूचक्कर झालेल्या तरुणाला पुण्यातून अटक

0

शहर पोलीस ठाण्याची कामगिरी ; हिंजवडी परिसरात राहत होता खोली करुन

जळगाव- शहरातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या मुलीला फूस लावून रफूचक्कर झालेल्या अजय विजय भालेराव वय 22 रा. गेंदालाल मिल या तरुणाला अल्पवयीन मुलीसस शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पुणे ताब्यात घेतले आहे. मुलीसोबत मंदिरात लग्न करुन दोघेही तरुणाच्या मेव्हणे राहत असलेल्या हिंजवडी परिसरात भाड्याची खोली करुन राहत असल्याची माहिती मिळाली आहे.

शहरातील गेंदालाल मिल परिसरातील 16 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याबाबत शहर पोलीस ठाण्यात 15 दिवसांपूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. घटनेच गांभीर्य ओळखत पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना सुचना केल्या होत्या. त्यानुसार डॉ. रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण निकम यांनी मुलीचा शोधार्थ पोलीस उपनिरिक्षक मीना तडवी, संजय बडगुजर, गणेश शिरसाळे, दिपाली पोरे यांचे पथक नियुक्त केले. पथकाला चौकशीअंती अल्पवयीन मुलीला गेंदालाल मिलमधील अजय विजय भालेराव याने पळविले असल्याची माहिती मिळाली.

मित्राला फोन केल्यामुळे लागला छडा
अजय भालेराव याने त्याचा गेंदालाल मिलमधील मित्राला फोन करुन काय परिस्थिती आहे, अशी विचारणा केली. याबाबतची माहिती गुन्हे शोध पथकातील गणेश शिरसाळे यांना मिळाली. त्यानुसार मित्राला विचारपूस केले असता, अजय मेव्हणे राहत असलेल्या ठिकाणी मुलीसह पुण्याला असल्याची माहिती मिळाली. नेमका कोणत्या ठिकाणी त्याचा सुगावा मात्र लागत नव्हता. यानंतर पथकाने अजयच्या मेव्हण्याचा नंबर मिळविला व शक्कल लढवीली. पोलिसांनी मेव्हण्याला फोन करुन एक महिला रेल्वेस्टेशनवर पडली असून तिच्याकडे तुझा नंबर असून तुम्ही रेल्वेस्टेशनवर या असे सांगितले. फोननुसार मेव्हणे रेल्वेस्टेशनवर पोहताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. व त्यांना अजय तसेच मुलीबाबत विचारणा केली. यानंतर हिंजवडी परिसरात अजय व मुलीसह राहत असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिसांनी अजयचे घर गाठले. तो घरी नव्हता. खात्री केल्यावर पोलिसांनी मुलीला व यानंतर अजयला ताब्यात घेतले. दोघांनी मंदिरात लग्न करुन ते हिंजवडी येथे राहत होते. अजय एका कचर्‍याच्या गाडीवर काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. दोघांना ताब्यात घेत पथकाने मंगळवारी सकाळी जळगाव गाठले.