भुसावळ/जळगाव : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणार्या तरुणास तीन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी हा निकाल दिला.
एमआयडीसी पोलिसात दाखल होता गुन्हा
जळगाव तालुक्यातील एका गावात 23 सप्टेंबर 2014 रोजी 17 वषीय अल्पवयीन मुलीचा आरोपी तरुणाने विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून तरुणाविरुध्द एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होता. जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यात तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक व इतर साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. साक्ष व पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने संशयित तरुणास गुरुवारी दोषी ठरवण्यात आले. पोक्सो कलमान्वये तीन वर्षे कैद व पाच हजार रुपये दंडांची शिक्षा सुनावली तसेच दंडाच्या रकमेतून चार हजार रूपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वैशाली महाजन यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.