अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; कागदपत्रात फेरफार करुन केला विवाह

0

जळगाव- लहान भावाला जीवे मारण्याची धमकी देवून तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर ठिकठिकाणी शारिरीक अत्याचार केला. यानंतर तिने आधारकार्ड, जन्म दाखल्यात फेरफार करुन तिला 18 वर्ष पूर्ण असल्याचे भासवित तिच्याशी दुय्यम निबंधक कार्यालयात जावून नोंदणी विवाह केला. यानंतर मुलीच्या आईमुळे बोंब फुटल्याने संबंधित तरुणाविरोधात एमआयडीसी पोलिसात बलात्कार, बाल लैगिंक अत्याचार, फसवणुकीचा दाखल करण्यात आला आहे. संशयित विक्की अशोक पाटील रा. कुसूंबा याला तपासधिकारी पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी गुन्हा दाखल होताच काही तासातच अटक केली आहे.

कुसूंबा येथील अल्पवयीन 17 वर्षीय मुलगी आई, वडील, लहा भाव, मावशी व मावस भाऊ अशा कुटुंबासह वास्तव्यास आहे. शहरातील एका महाविद्यालयता मुलगी 11 वीत शिक्षण घेत आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2018 मध्ये मुलीच्या गल्लीतच राहणार्‍या विक्की अशोक पाटील या तरुणाने मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याशी लग्न करायचे असे सांगितले. यानंतर माझ्याशी बोलली नाहीत तर तुझ्या लहान भावाला मारुन टाकीन अशी धमकी दिली. धमकीमुळे मुलीने घरी कुणालाही हा प्रकार सांगितला नाही. यानंतर पुन्हा विक्कीने मुलगी जात असलेल्या रस्त्यावर थांबला व पुन्हा लहान भावाला मारण्याची धमकी देवून मुलीला घरी घेवून गेला व जबरदस्तीने मुलीवर शारिरीक अत्याचार केले. भावाला मारण्याच्या धमकीमुळे भेदरलेल्या मुलीने घरातील सर्वांपासून प्रकार लपविला.

दाखला, आधारकार्डवरील जन्म तारखेत बदल
धमकीमुळे मुलगी प्रकार सहन करत होती. यानंतर विक्कीने पुन्हा तिला अजिंठा येथील पद्मालय लॉज येथे घेवून जावून तेथे देखील जबरदस्तीने शारिरीक अत्याचार केले. यानंतर विक्कीने मुलीला तिचे आधारकार्ड व जन्म दाखला व पासपोर्ट घेवून नेरीनाका येथे बोलाविले. याठिकाणाहून त्याने मुलीच्या दाखल्यावर जन्म दाखल्या तसेच नेरीनाका येथे एका लॅबमध्ये आधारकार्डमधील जन्म तारखेत 16/02/2002 वरुन 16/02/2000 असा बदल करुन कागदपत्रात फेरफार केली.

साक्षीदारांनाही लग्न महाग पडणार
मुलीच्या फेरफार करुन घेतलेल्या कागदपत्राच्या आधारावर 3 डिसेंबर 2018 रोजी विक्कीने दुय्यम निबंधक कार्यालय जळगाव येथे विवाह केला. यावेळी सही करण्यास विरोध करणार्‍या मुलीला विक्कीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. यावेळी साक्षीदार म्हणून दुर्गादास गणपत कांबळे, प्रकाश महादेव तिवारी, सुभाष मोरेश्‍वर पसरे उपस्थित होते. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर झालेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह साक्षीदारांना चांगलाच महाग पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गुन्हा दाखल होताच विक्कीला अटक
याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन विक्की अशोक पाटील विरोधात सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील हे करीत असून कर्मचार्‍यांसह सोमवारी रात्रीच कुसूंबा येथून विक्कीला अटक केली आहे.