एक वर्ष कारागृह असल्याने शिक्षेतून सेटअप मिळणार
जळगाव : अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्हयाच्या खटल्यात गुरूवारी जिल्हा न्यायालयाने संशयित तरुण सागर कोळी रा.वडगाव लांबे, चाळीसगाव यास दहा वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा तसेच दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. तरुण एक वर्षापासून कारागृहात राहिल्याने हा कालावधी शिक्षेतून सेटअप करून मिळणार आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे येथील 16 वर्षीय मुलगी 20 ऑक्टोंबर 2014 रोजी बेपत्ता झाली होती. त्याच दिवशी गावातील तरूण बेपत्ता झाल्याचे पिडीत मुलीच्या पालकांना कळाली. नंतर या प्रकरणी मेहणुबारे पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेल्या फिर्याद दिल्यावरून याप्रकरणी सागर कोळी विरोधात भाग 5 गुरन 135/15 भादवी कलम 363,366 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात पोलिसांनी संशयीत सागर याला 23 ऑक्टोबर 2014 रोजी अटक केली. या गुन्हयात नंतर कलम 376 सह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 3, 4, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी गुन्हयाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या कोर्टात सादर केले.
याच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
खटल्याच्या चौकशीच्या कामकाजात सरकार पक्षातर्फे डीएनए एक्सपर्ट, पिडीत बालिका, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासाधिकारी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. न्यायालयाने संशयीत सागर याला भादवी कलम 363, 366 खाली दोषमुक्त केले. तर समोर आलेल्या पुराव्यावरून सागर याला भादवी कलम 376 तसेच पोक्सो
कलम 6 खाली दोषी ठरवून दहा वर्ष सक्तमजूरी शिक्षा व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने कारावास अशा शिक्षेची तरतूद केली. सरकार पक्षातर्फे अॅड. शिला गोडंबे तसेच अॅड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.