मुंबई – पंधरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 27 वर्षांच्या आरोपीस घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. मनोज कमला चौहाण असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध बलात्कारासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला येथील विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पिडीत मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पंधरा वर्षांची ही मुलगी घाटकोपर परिसरात राहते. काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी तिला तिच्या पालकांनी जवळच्या रुग्णालयात नेले होते. तिथे वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ती मुलगी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी तिच्या पालकांना सांगितले. या माहितीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिची चौकशी केली असता तिने तिचा वडिलांचा मित्र मनोज चौहाण याने तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. या घटनेनंतर त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मनोज चौहाणविरुद्ध बलात्कारासह बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. पिडीत मुलीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असून तिची तिथेच वैद्यकीय चाचणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.