ओतूर । डिंगोरे मराडवाडी येथील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणार्या जुन्नर तालुक्यातील मराडवाडी, डिंगोरे येथील एका 32 वर्षीय तरूणाला ओतूर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
चार महिन्यांनी सापडली मुलगी
हौसीराम बबन पारधी (वय 32 रा. मराडवाडी, डिंगोरे ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो विवाहित आहे. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सूरज बनसोडे अधिक माहिती देताना म्हणाले की, दि. 22 एप्रिल 2017 रोजी मराडवाडी डिंगोरे येथून पहाटे चार वाजता एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या वडिलांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार ओतूर पोलीस व पिडीत मुलीच्या वडिलांनी मुलीची शोधाशोध सुरू केली असता, ही मुलगी चार महिन्यांनी हौसीराम बबन पारधी याच्याबरोबर खांडगाव (ता. संगमनेर जि. अहमदनगर) येथे 16 ऑगस्ट रोजी मिळून आली.
आरोपी मराडवाडीचा रहिवासी
हौसीराम हा खांडगाव येथील एका शेतकर्याकडे झोपडी करून कामाला राहत होता. हौसीराम पारधी याने या मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचे या मुलीने पोलिसांना सांगितले. दरम्यान हौसीराम हा विवाहीत असून तो जुन्नर तालुक्यातील मराडवाडीचा रहिवासी आहे. पीडित मुलीच्या वयाचा हौसीरामचा मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलीची वैद्यकिय तपासणी करून तिला तिच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले असल्याचे ओतूर पोलिसांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शेख करीत आहेत.