अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊनही तक्रार देण्यास आईचा नकार

0
महिला अत्याचार विरोधी समितीमुळे प्रकरणास फुटली वाचा
 पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केले. तिची गर्भधारणा झाल्यानंतर त्याने मुलीला सोडले. मुलीने नुकताच मृत बाळाला जन्म दिला. बाळाची परस्पर विल्हेवाट लावून कुटुंबीयांनी देखील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिंपरी- चिंचवड वूमेन हेल्पलाईनच्या महिला अत्याचार विरोधी समितीने या प्रकरणाला वाचा फोडली आहे. मुलीला न्याय देण्यासाठी समितीची धडपड सुरु आहे. मात्र, पीडित मुलीने व आईने तक्रार नसल्याचे सांगितले.
पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आंबेगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर उपचार सुरु आहेत. तिच्यावर बलात्कार झाला असून तिने 21 डिसेंबर रोजी एका मृत मुलाला जन्म दिला आहे. त्या बाळाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून प्रकरण दडपण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकारामुळे मुलीचे कुटुंबीय भेदरले असल्याने ते तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत. ही घटना अतिशय गंभीर आहे.
पोलिसांनी पुढाकार घेत त्या मृत बाळाची डिएनए चाचणी करणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी देखील याकडे दुर्लक्ष केले. अल्पवयीन मुलीने जन्म दिलेल्या बाळाचा बाप शोधण्यासाठी मृत बाळाची डीएनए तपासणी करणे गरजेचे आहे. त्यातून आरोपीचा शोध घेऊन आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी महिला अत्याचार विरोधी समितीने पोलिसांकडे केली. तसेच आरोपीला शासन न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा समितीच्या अध्यक्षा नीता परदेशी यांनी दिला आहे.
पिंपरी- चिंचवड वूमेन हेल्पलाईनच्या महिला अत्याचार विरोधी समितीच्या सदस्यांनी रविवारी (दि. 23 ) पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. त्यांनी देखील या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घोडेगाव पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार घोडेगाव पोलिसांनी पुन्हा एकदा रुग्णालयात जाऊन कुटुंबियांना फिर्याद देण्यासाठी समजावले. मात्र, तरी देखील मुलीच्या आईने फिर्याद देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.