अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयितास 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

0

म्हसावद येथील 2016 मधील घटना ; शौचालयास बाहेर पडल्यावर तोंड दाबून, धमकी देत अत्याचार

जळगाव – शौचालयातसाठी घराबाहेर पडलेल्या तालुक्यातील म्हसावद येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडीलांना तसेच भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देवून तसेच समाजात बदनामी करेल अशी धमकी देत वारंवार समाधान पंढरीनाथ मराठे, वय 27 याने व लैंगिंक अत्याचार केल्याची घटना 30 जानेवारी 2016 रोजी घडली होती. या खटल्यात संशयित समाधान मराठे यास न्यायालयाने 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला.

17 वर्षीय पिडीत नैसर्गिक विधीसाठी महीलांचे सार्वजनिक शौचालयात गेली असता तिचे तोंड दाबुन, तिला बाजुला नेवून तिला, तिच्या वडीलांना व भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्यावर लैगिक अत्याचार केला. त्यानंतरही समाजात तिची बदनामी करेल, अशी धमकी देवून पाच ते सहा वेळा पिडील मुलीवर
लैंगिक अत्याचार केला, त्यामुळे पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन संशयित समाधान मराठे विरोधात एमआयडीसीपोस्टे येथे गुन्हा दाखल झाला होता.

9 साक्षीदार तपासले
एम.आय डी.सी.पोलीस ठाण्याचे तपासाधिकारी, पोलीस उप निरीक्षक नाना सर्यवंशी यांनी जळगाव सत्र न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात मे.न्यायालयात अभियोगपक्षातर्फे एकूण 09 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत बालिकेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. अभिलेखावरील महत्वाचे उपलब्ध दस्तऐवज आणि सरकारपक्षाचा युक्तिवाद लक्षात घेता न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.

अशी सुनावली शिक्षा
न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात या खटल्याचे काम चालले. यात 26रोजी आरोपीस भा.द.वि.376(2)एन., व बालकांचे लैंगिक गुन्हयापासून संरक्षण कायदा कलम 5 एल अन्वये 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 10 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 1 वर्षाची साध्या कारावासाची शिक्षा आणि भा.द. वि.कलम 506 अन्वये 1 वर्षे कारावासाची तसेच 1 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 1 महीना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅडव्होकेट चारुलता राजेंद्र बोरसे तर आरोपीतर्फे अँडव्होकेट पी.के. देशमुख यांनी काम पाहीले. तसेच या कामी पैरवी अधिकारी शालीग्राम पाटील, सहा. फौजदार व तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.