जळगाव । गेल्या एक वर्षापूर्वी एका तरूणाचे मावशीच्या मुलीशीच सुत जुळले. यानंतर त्याने तिला पळवून नेत आपला संसार थाटला. मात्र, याबाबत मुलीच्या कुटूंबियांनी पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलीसांकडून तरूणांचा शोध सुरू होता. अखेर तरूणाविरूध्द पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी तरूणाला त्या अल्पवयीन मुलीसह दिंडोरी या गावातून ताब्यात घेतले. पोलीसांनी मुलीला पालकांच्या ताब्यात दिले असून तरूणाची पोलीसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
आई-वडील नाही म्हणून दिपक (नाव बदलेले) हा शहरातील देविदास कॉलनी येथील मावशीच्या घरी रहायचा. या दरम्यान, त्याचे घरातच राहणार्या मावस बहिणीशी सुत जुळले. दोघांमध्ये प्रेमसंबध जुळल्यानंतर त्यांनी पळवून जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर 16 डिसेंबर 2015 रोजी दिपक याने त्या मुलीस पळवून नेले. घरात मुलगी व दिपक दिसत नसल्याने तिच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी तपासाला सुरूवात केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पीएसआय कविता बडगुजर यांनी दिपक व तरूणीची माहिती काढण्यास सुरूवात केली. यात त्यांना एका मोबाईल नंबरचे लोकेशन मिळाले मात्र तेही दुसर्याच व्यक्तीचे निघाले. परंतू तो व्यक्ती हा दिपक याचा मावस भाऊच असल्याचे कविता बडगुजर यांना कळाले. त्यांनी लागलीच पोलीस नाईक भरत लिंगायत, अभिलाषा मनोरे, पोलीस कर्मवारी वाघ अशांचे पथक तयार करून दिंडोरी या गावातून दोघांना अटक केली.