अल्पवयीन युवतीला पळवणार्‍या आरोपी तरुणाला लोहमार्ग पोलिसांकडून अटक

भुसावळ : युपीतील गाजीपूरच्या तरुणीला पळवून नेल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी पंजाबच्या लुधियानातून मुसक्या आवळल्या आहेत तर आरोपीसोबतच्या तरुणीची जळगावच्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून आरोपीविरोधात गुन्ह्यात पोस्कोचे कलम वाढवण्यात आले आहे. दीपक यादव (रा.गाजीपूर, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पाच महिन्यांपूर्वी तरुणीला पळवले
गाजीपूर येथील सतरा वर्षीय युवती ही तिच्या भावा सोबत रेल्वे गाडीने जात असतांना, युवतीला दीपक यादव (रा. गाजीपूर, उत्तर प्रदेश) याने फुस लावून भुसावळातील प्लॅटफॉर्म सहावरून सचखंड एक्स्प्रेसने पळवून नेले होते. यया प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. गेल्या पाच महिन्यांपासून या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार अरुणा कोहरे, गणेश पाचपोळ, नरेंद्र लोढे करीत होते. तांत्रिक विश्‍लेषणानंतर आरोपी पंजाबच्या लुधियानात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.
संशयीत दीपक यादव याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, 31 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे.