अभिनेते नाना पाटेकर यांनी शिवकुमार डिगे यांच्या कार्याचा केला गौरव; ‘यशदा’ येथे निरोप समारंभ
पुणे : गरीब शेतकर्यांच्या मुलींच्या लग्नासाठी सर्व धर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात तब्बल तीन हजार विवाह झाले. त्यासाठी शिवकुमार डिगे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा सोहळा पार पडला. त्यांनी अल्पावधीत धर्मादाय कार्यालयाचा कायापालट केला. त्यांनी गरीब आणि सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना कुटुंबांना आधार ठरत असून, त्यांना अजून काही दिवस या पदावर काम करण्याची संधी मिळायला हवी, अशी इच्छा अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त करत डिगे यांच्या कार्याचा गौरव केला.
राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांची उच्च न्यायालयात प्रबंधक (निरीक्षण) पदी बदली झाल्याने त्यांचा ‘यशदा’ येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. धर्मादाय आयुक्त आशुतोष करमरकर, मुंबईचे धर्मादाय सहआयुक्त सय्यद, औरंगाबादचे सहआयुक्त श्रीकांत भोसले, पुण्याचे धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख, धर्मादाय उपआयुक्त भरत व्यास, नवनाथ जगताप उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, डिगे यांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत वैद्यकीय सेवा, डायलेसिस, मोफत चारा छावण्या राबविल्या. तर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी विविध योजना सुरू केल्या असून, त्या पुढेही सुरू ठेवण्यात येतील, असे मत सय्यद आणि दिलीप देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्त साजीद रचभरे, राहुल चव्हाण, राणी मुक्कावार आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.