भुसावळ- भुसावळ शहरात प्रथमच भव्य अशा पद्धत्तीने झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेने शहरवासीयांमध्ये रविवारची पहाट चैतन्य निर्माण करून गेली. आयोजकांनी स्पर्धकांची बडदास्त राखली असतानाच सर्व सहभागी धावपटूंसाठी भुसावळातील प्रसिद्ध अशा अष्टभूजा डेअरीचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे व त्यांच्या सुविद्य पत्नी व नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांच्यातर्फे उपम्यासह केळीचे वाटप करण्यात आले.
तीन, पाच व दहा किलोमीटर अंतर धावून आलेल्या धावपटूंना या अल्पोपहाराने ‘इन्स्टंट एनर्जी’ मिळाली व त्यांनी आयोजकांसह दात्यांना ‘क्या बात है’ म्हणून दादही दिली. शहरात यापूर्वी स्पर्धा झाल्या असल्यातरी एकाचवेळी एक हजार 250 स्पर्धकांसह त्यांच्या जोडीला शहरातील लहान-थोरांसह शेकडो वयोवृद्धांनी देखील धावत त्यांचा उत्साह वाढवला आयोजक असलेल्या पोलीस दलालाही शहरवासीयांनी धन्यवाद दिले. या स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे यांच्यासह सिद्धीविनायक ग्रुपचे कुंदन ढाके व अन्य दात्यांचे सहकार्य लाभले. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह आयोजन समितीतील सदस्यांनी दिवसरात्र एक करून स्पर्धा यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले हेदेखील विशेष !