अल्प उत्पन्नधारकांना घरकुले उपलब्ध करुन दिली जाणार

0

भुसावळ । प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेद्वारे आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणार्‍या लाभधारकांना भुसावळ नगरपरिषदेतर्फे घरकुले उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी येथे केले. भुसावळ येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वांसाठी घरकुले या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

चार टप्प्यांमध्ये मिळणार लाभ
याप्रसंगी कार्यक्रमास नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक अमोल इंगळे, रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, जगदिश विभांडीक, आकाश सोनार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांसाठी घरकुले ही योजना पालिकेने उपलब्ध करुन घेतली आहे. या योजनेंतर्गत ज्यांना स्वतःचे घर नाही त्यांच्यासाठी घरे उपलब्ध करुन देण्यात येतील. यासाठी ही योजना चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यात ज्यांना स्वतःची घरे नाहीत किंवा अतिक्रमित जागेत घरे आहेत त्यांचा प्रथम अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. दुसरा टप्पा ज्यांच्यावर स्वमालकीची जागा आहे त्यांची व्यवस्था करण्यात येईल. तिसर्‍या टप्प्यात भाडेकरुंसाठी व्यवस्था होईल.
चौथ्या टप्प्यात जे बिल्डर शासकिय सवलती घेवून घरे बांधून त्यातील काही भाग हा गरीब जनतेसाठी देतील. त्या घरकुलांमध्ये काही लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे. भुसावळ शहरात वॉर्ड क्रमांक 1 पासून या योजनेची सुरुवात झाली असून या माध्यमातून शहरातील बेघर व गरीब जनतेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच शहराचा नगराध्यक्ष म्हणून सर्वांसाठी घरकुले म्हणून जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे व उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले आहे. योजनेसाठी लागणारे अर्ज विनामुल्य उपलब्ध करुन देणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.