जळगाव : यावलसह फैजपूरातून दुचाकी चोरी करून ती अल्प किंमतीत विक्री करणार्या तसेच तिची खरेदी करणार्या तिघा भामट्यांच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. तुषार संतोष सपकाळे (22), तेजस विकास सपकाळे (20, दोघे रा.अंजाळा, ता.यावल) व राहुल शाम मोरे (20, रा.हनुमंतखेडा, ता.एरंडोल) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
यावल तालुक्यातील अंजाळे येथील दोन तरुण हे दुचाकी चोरी करुन विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पोलिस अंमलदार दीपक पाटील, महेश महाजन, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, अशोक पाटील यांच्या पथकाला अंजाळा येथे रवाना केले. अंजाळा येथून संशयीत तुषार सपकाळे व तेजस सपकाळे या दोघांना पथकाने अटक केली. त्यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरीची कबूली दिली तसेच यावल येथून चोरलेली दुचाकी एरंडोल तालुक्यातील राहूल मोरे यास विक्री केल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने राहुल मोरे यालही अटक केली. तिन्ही संशयितांना पुढील तपासासाठी यावल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.