पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई महामार्गावर कासारवाडी येथील मे. अल्फा लावल कंपनी प्रशासनाने कंपनीतील 402 कर्मचार्यांना 1 ऑक्टोबर 2013 रोजी अचानक घरचा रस्ता दाखवला. मागील चार वर्षांपासून कर्मचारी विविध मार्गाने कंपनी प्रशासनास विनंती करीत आहेत. परंतु कंपनीने त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेतर्फे कामगारांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येत आहे. कामगारांच्या प्रश्नावर कंपनी प्रशासन दहा दिवसात सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
402 कामगारांना काढले
कंपनीतील कामगारांनी कामगार संघटना तयार केली. याचा राग धरून कंपनीने ही कारवाई केली आहे. त्यामुळे अचानक घरी लावण्यात आलेल्या कामगारांच्या घरावर आर्थिक कुर्हाड कोसळली आहे. कामगारांनी अनेक मार्गांनी कंपनी प्रशासनाला घरी बसवण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत विनंती केली, परंतु कंपनी प्रशासनाने त्यावर जाणीवपूर्वक डोळेझाक केली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव कामगारांना धरणे आंदोलन करावे लागत आहे, असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी सांगितले.
सकारात्मक चर्चा
भोसले म्हणाले, कंपनीत कंत्राटी कामगार भरतीला बंदी आणण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. त्या आदेशांना न जुमानता कंत्राटी कामगारांची भरती करण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी 402 कामगारांवर जी वेळ आली तीच वेळ सध्या कार्यरत असलेल्या कामगारांवर देखील येणार आहे. त्यामुळे कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी कंपनीत नसल्याचे कारण सांगत कंपनी प्रशासनाने दहा दिवसांची मुदत घेतली आहे. या दहा दिवसात अचानक कमी करण्यात आलेल्या 402 कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात येणार आहे.