अल हुसैनी इमारत दुर्घटनेप्रकरणी एकाला अटक

0

मुंबई । भेंडीबाजार परिसरातील अल हुसैनी ही 117 वर्ष जुनी इमारत सप्टेंबर 2017 मध्ये कोसळली. आता निष्काळजीपणामुळेच ही इमारात कोसळली या आरोपाखाली जे. जे. मार्ग पोलिसांनी सैफी बुर्‍हानी अपलिफ्टमेंट ट्रस्टचा (एसबीयूटी) व्यवस्थापक शोहेब हाशिम वजिउद्दीन याला अटक केली. या इमारत दुर्घटनेत गेल्यावर्षी 37 जणांचा मृत्यू झाला होता. या इमारतीमध्ये आरसीवाला कुटुंबांसह एकूण चार कुटुंब राहत होती. या जुन्या तीन मजली इमारतीवर कालांतराने दोन मजली लोखंडी पिलर उभे करून वाढवले होते. मुळात अल हुसैनी या इमारतीचा भेंडीबाजार क्लस्टर डेव्हल्पमेंट योजनेत समावेश करण्यात आला होता. या पुनर्विकासासाठी म्हाडाने इमारतीला ना हरकत प्रमाणपत्रही दिले आहे. त्यामुळे इमारतीची जबाबदारी बिल्डरवर होती, असे म्हाडाकडून पोलीस चौकशीत म्हटले होते.

म्हडाने झटकले हात
इमारतीच्या पुनर्विकासाच्या दृष्टीने म्हाडाने 11 डिसेंबर 2012 ला रहिवाशांना ना हरकत प्रमाणपत्रही दिले होते. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाकडून संबंधित विकासकाकडे गेली होती. इमारत कमकुवत असली, तरी पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्याने इमारतीच्या दुरुस्तीची जबाबदारी आमची नव्हती, असे म्हाडाने स्पष्ट केले. म्हाडाने पावसाळ्यापूर्वी मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींची पाहणी करून सुमारे नऊ इमारती अतिधोकादायक जाहीर केल्या. परंतु, या इमारतीला पुनर्विकास करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे पुनर्विकासाची जबाबदारी संबंधित विकासकाकडे गेली होती. परिणामी, या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी सैफी बुर्‍हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) व्यवस्थापक शोहेब हाशिम वजिउद्दीनला पोलिसांनी अटक कली आहे.