अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप रस्त्यावर उतरणार: देवेंद्र फडणवीस

0

कोल्हापूर: महाविकास आघाडीच्या सरकारने विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कर्जमाफीची घोषणा केली. त्यावर भाजपने टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे आरोप केले होते. दरम्यान आता अवकाळीग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कोल्हापूरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हिवाळी अधिवेशन संपताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, आज कर्जमाफीची सर्वाधिक गरज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना असताना त्यांना ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारने अवकाळीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे ९४ लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे परत करण्याची त्यांची क्षमताच राहिलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीची सध्या सर्वाधिक गरज होती. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा या लोकांना होणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.