अवकाळीचा कहर, दोघांचा मृत्यू

0

लातूर/बीड : मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. बीड जिल्ह्यातील परळीमधील कौठाळी शिवारात अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. तर तीन जनावरे दगावली. लातूर, उस्मानाबादमध्येही वादळी वार्‍यासह पाऊस झाला. पंढरपुरात गारपीट झाल्याने आंबा, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या गावात वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात गारपीट झाली. नांदेड, परभणीतही दिवसभर पावसाचे वातावरण होते. मराठवाड्यासोबत सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.

शेतकरी चिंतातूर
परळी तालुक्यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने शेडनेटमधील मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील अर्जुनेश्वर देवस्थान येथे झाड कोसळल्याने गाड्यांचे नुकसान झाले. लातूरमध्ये दुपारी 12 पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर बीड जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

मराठवाड्यात गारपीट
अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी गहू पिकाची काढणी झाली असल्याने मोठे नुकसान झाले आहे. लातूरमध्ये दुपारपासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. येथे हाताशी आलेले पीक मातीमोल झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडला. यामुळे आंबा, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील समुद्रवाणी, लासोना परिसरात अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. द्राक्ष, आंबा, हरभरा आणि ज्वारी पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील औराद, शहाजनी, निटुर, शिरुर, अनंतपाळ, औसा तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पाऊस कोसळला.

द्राक्ष, ज्वारी, गहू पिकाचे नुकसान
पुढरमधील सरकोली, ओझेवाडी परिसरात गारांसह पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, ज्वारी, गहू पिकांचे नुकसान झाले. पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथेही गारपीट झाली. दुष्काळातून सावरत असलेल्या मराठवाड्याची चिंता पावसाने पुन्हा एकदा वाढली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या उमेदीने कामाला लागला होता. पण अनेक ठिकाणी अवकाळीमुळे पुन्हा पीक हाततून गेले आहे.