अवकाळीच्या ‘झळा’ शांत होत नाही तोच हवामान बदलाच्या ‘कळा’

भडगाव। निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे.अवकाळीच्या कळा शांत होत नाही तेवढ्यात शेतकर्‍यांना हवामान बदलाच्या ‘झळा’ बसायला सुरुवात झाली आहे. पावसाळी पिके अती पावसामुळे हाती आलेली वाया गेली. या पिकांना शेतकर्‍यांनी मोठा खर्च केला. पण खर्चाच्या तुलनेत उत्पन्न निम्यावर येऊन ठेपले. यातून जेमतेम सावरत व विहिरींना यावर्षी मुबलक पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतात मोठ्या प्रमाणात रब्बीची गहू, हरबरा, मका, ज्वारी, बाजरी सूर्यफूल आदी पिके पेरली. परंतु हवामान बदलामुळे पिकावर परिणाम होताना दिसत असल्यामुळे पिके हातची जाण्याची भीती शेतकर्‍यांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे आता हवामान बदलाच्या ‘कळा’ शेतकर्‍यांना सोसाव्या लागत आहे.

सतत हवामान बदलामुळे हरभरा पिकावर अळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे फुल गळतीचे प्रमाण वाढले. त्यामुळे उत्पन्न घटण्याचे संकेत मिळत आहे. हवामान बदलामुळे हरभरा सुकत आहे. हवामानाच्या लहरी पणामुळे व वातावरणात सतत गारवा असल्यामुळे मका, ज्वारी या पिकांवर अळीचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे महागडी कीटकनाशक पिके वाचविण्यासाठी फवारणी करावी लागत आहेत. वातावरणात धुक्याचे प्रमाण सतत असल्यामुळे सूर्यफूल पिकाला त्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. यामुळे फुलात बी परिपक्व कमी होत आहे. परिमामी शेतकर्‍यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होईल. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न निम्यावर येईल. निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांच्या मुळावर बसला आहे.

पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड
पावसाळी कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन अती पावसामुळे मोठा खर्च करूनही हातातून गेली. परंतु कापसाला कधी नव्हे असा विक्रमी भाव मिळाल्याने खर्च तरी हाती आला. त्याच उमेदीने शेतकरी रब्बीच्या तयारीला लागला. पण निसर्गाच्या लहरी पणामुळे वातावरणात सतत होणारे बदल कधी उन्हाचा कडाखा तर कधी अती गारठा पिकांना त्रासदायक ठरत आहे. यामुळे पिकावर रोगराईचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पिकांना वाचविण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.