अवकाळी पावसाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा

0

शिरपूर। अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यातील शेतीला झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्या असे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी धुळे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना दिले. शिरपूर भागातील काही ठिकाणी दोन दिवसाआधी अचानक वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून विविध कारणांनी बेजार झालेल्या शेतकर्‍यांच्या अडचणींत भर पडली आहे. तालुक्यातील उत्तर व पूर्व भागात अर्धा ते एक तास जोरदार अवकाळी पाऊस झाला. सकाळपासून कडक ऊन तर अधून मधून आकाशात काळे ढग असे वातावरण अनेक ठिकाणी पहावयास मिळाले. दुपारी दोननंतर अनेक ठिकाणी वादळी वार्‍यांसह पावसाच्या सरी कोसळू लागल्या. पावसासोबत काही भागात जोरदार वारा सुद्धा होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने लोकांची एकच तारांबळ उडाली.

तालुक्यातील जनता शेती व्यवसायावर अवलंबून
विविध कारणांमुळे यंदा पीक येऊनही कमी भावाने शेतमाल विक्री करण्याची वेळ आल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागले. त्यात झालेल्या अवकाळी पाऊस व तुफान वार्‍यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांसमोरील संकटात आता अधिक भर पडल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.आमचा तालुका हा आदिवासी बहुल सातपुडा पायथ्या वसलेला तालुका आहे येथील जनता अधिकतर शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. या अवकाळी पाऊस व वार्‍यामुळे मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी या विनंतीचे निवेदन शिरपूर भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांना दिले.