ग्रीष्मातील कडाक्याच्या उन्हाचे चटके सहन करावे लागतात, म्हणून वसंत ऋतूची प्रतीक्षा लागते. यालाच ‘चातकाची प्रतीक्षा’ म्हटले जाते. त्या वसंत ऋतूच्या प्रारंभीच्या काही दिवसांमध्ये वातावरणात जणू स्वर्ग अवतरला आहे, असे मनमोहक रूप निसर्ग परिधान करतो. अशा दिवसांमध्ये वारकरी बांधवांना पंढरीच्या आषाढ वारीचे वेध लागतात. मैलोनमैल दर्याखोर्यातून, घाटातून चालणार्या वारकरी बांधवाला जेवढा हा निसर्ग कळतो, तेवढा तो आठवड्यातून एक दिवस सुटी घेऊन तेवढ्यापुरते ट्रेकिंग करून चवीपुरता निसर्ग उपभोगून पुन्हा आपल्या कामाला लागणार्या शहरी माणसाला कधीच कळत नाही. पंधरा-वीस दिवसांपूर्वी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज या संतद्वयींच्या पादुका घेऊन निघालेल्या पालख्या श्री विठ्ठलाला भेटण्यास पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मध्ययुगातली जिवंत साक्ष देणारी ही वारी आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे. किंबहुना त्यात अधिक भक्तिरस ओसांडून वाहत आहे. तब्बल 4 शतकांहून अधिक काळ एक धार्मिक परंपरा कायम टिकवून राहिली, हे जगातील एकमेव उदाहरण आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरणार नाही. आज आषाढी एकादशीनिमित्ताने पुन्हा एकदा या इतिहासाची पुनर्निर्मिती होणार आहे. पिढ्यानपिढ्या या वारीला जाणारे वारकरी बांधव आता या महाराष्ट्राचा सन्मान बनले आहेत. आधुनिक युगात अनेक भौतिक सुखाची माध्यमे उपलब्ध झाली असली, तरी वारीत सहभागी होण्याची इच्छा शहरी भागातील तरुणाईमध्ये वाढताना दिसत आहे, हे एकप्रकारे वारीमधील आशादायी चित्र म्हणावे लागते. अनंत ब्रह्मांड स्वरूप तो भगवंत जसा ठेवील तसे राहायचे. त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान भागवायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केंद्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारकरी बांधवांचे भक्तिमय जीवन असते. अशा या भागवत धर्माचा प्रसार आजच्या पिढीमध्ये होणे काळाची गरज बनली आहे. लाखोंच्या संख्येने ज्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात यायचे, त्याचे दर्शन या गर्दीतून मिळणार नाही, हे माहीत असूनही शेकडो मैल पायपीट करून आषाढीला चंद्रभागेत स्नान करून लांबूनच कळसाला नमस्कार करून पुन्हा माघारी फिरायचे यातूनच आसक्ती क्षणात सोडून देण्यास शिकवणारा हा भागवत धर्म आजच्या पिढीला जर समजला, तर समाजातील राग, लोभ, द्वेष, मद, मोह, मत्सर या षडरिंपूचे प्राबल्य कमी होऊन समाज अधिक सशक्त बनेल.
दरवर्षी पंढरपुराच्या दिशेने चार वार्या निघतात, पण आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वातील वारीला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या निघालेल्या दिंड्या पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करून पंढरपुरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात, असे सागितले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु, ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सुसूत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन 1685 साली श्री तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपुराला घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली. तेव्हापासून दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत. आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. भगवंत या एकादशीपासून शयन करतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो. आज सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करून संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा घालतील. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय राम कृष्ण हरी’ हा नामघोष करतील, सारे वातावरण विठ्ठलमय होईल. सरदार खाजगीवाले यांच्या वाड्यातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातून प्रदक्षिणा मार्गाने मिरवणूक निघेल. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होईल. अशा या वारीत काळाच्या ओघात एक राजकीय परंपरा घुसवण्यात आली आहे. आषाढी एकादशीची श्रीविठ्ठल-रखूमाईची पूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येते. अर्थात मागील अनेक वर्षांपासून केवळ हीच प्रथा वारीला वादात अडकवत आहे. यंदाच्या वर्षी सरकारने 40 लाख शेतकर्यांना कर्जमाफी दिली. मात्र, ही कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप करून एक गटाने आज मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात श्री विठ्ठलाची पूजा करू देणार नाही, असा इशारा दिला. अशा प्रकारे राजकीय प्रथेप्रमाणे यंदाच्या वर्षीही वारीचा राजकीय वापर करण्याची प्रथा कायम ठेवण्यात आली आहे.