भुसावळ विभागात विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनार्थ मांदियाळी
भुसावळ- आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ विभागातील श्री विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी सोमवारी पहाटेपासून दर्शनार्थ गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. दात्यांतर्फे भाविकांना ठिकठिकाण केळी व साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावलच्या प्ले स्कूलमध्ये चिमुकल्यांनी काढली दिंडी
यावल- शहरातील न्यू बचपन प्ले स्कूलमध्ये चिमुकल्यांनी आषाढीनिमित्त दिंडी काढली. प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी पांडुरंग, रूखमाई व वारकर्यांची वेशभूषा वठवली. दिंडीच्या सुरुवातीला पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिंडी शाळेपासून निघाडल्यानंतर पांडुरंग सराफ नगरमार्गे मनुदेवी मंदिरामार्गे परत शाळेकडे निघाली. मनुदेवी मंदिरात शाळेचे चेअरमन कैलास माळी यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना फराळाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेने शहरवासीयांचे लक्ष वेधले. दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेचे चेअरमन कैलास माळी व शाळेच्या कर्मचार्यांनी सहकार्य केले.
भुसावळ बसस्थानकावर प्रवाशांना फराळाचे वाटप
भुसावळ- शहरातील एस.टी.बसस्थानकावर कर्मचारी बांधवांनी आषाढ़ी एकादशीनिमित्त वारकरी व प्रवाश्यांना फराळाचे वाटप केले. महाआरतीचा मान प्रवाशांना देण्यात आला. रसलपुर, ता.रावेर येथील प्रवासी प्रमोद चौधरी व भाग्यश्री तसेच म्हसावद येथील प्रवासी धर्मा व जयवंताबाई पाटील या जोडप्याने आरती केली. महाआरतीनंतर प्रसाद व फराळाचे वाटप स्थानकप्रमुख पी.बी.भोई यांनी केले. दिवसभर पांडुरंगाच्या नामस्मरणाची ध्वनीफित सुरू असल्याने बसस्थानकात प्रवाशांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ए.जे.अंबोले, किशोर नेवे, सुरेश चौधरी, धर्मराज देवकर, प्रवीण पाटील, सतीश बोंडे, युवराज फालक, ए.बी.जावळे, बी.एम.राणे, ए.व्ही.बोंडे, जे.बी.पिंगळे, एस.जे.बेंडाळे, पी.बी.भोई, बी.एस.पाटील यांनी परीश्रम घेतले.
श्री क्षेत्र ओंकारेश्वरात भाविकांच्या लागल्या रांगा
रावेर- आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर (ता.रावेर) येथे विठ्ठल रूखमाईचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती. महाराष्ट्रभरात आषाढी एकादशीनिमित्त भगवान विठ्ठल व रुखमाईच्या दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लागल्या होत्या. रावेर, मुक्ताई नगर, यावल व मध्यप्रदेशच्या बर्हाणपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले. निंभोरा येथील नामदेव ढाके यांच्या परीवारातर्फे फराळाची व्यवस्था करण्यात आली.