अवघ्या 3 हजार रुपयात राबतोय पोलीस पाटील

0

मुंबई : सध्या महाराष्ट्रात पोलीस पाटलांची 47 हजार पदे असून 27 हजार पदेच कार्यरत असून अद्याप 20,000 पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी असल्याने कार्यरत असलेल्या पोलीस पाटीलांना राबवले जात आहे. त्यात त्यांचा पगार ही तुटपुंजा असल्याने आज महाराष्ट्रातील गावाची आणि गावातील नागरिकांची सेवा करणार्या पोलीस पाटील यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे, अशी व्यथा गुरुवारी विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघाने पत्रकार परिषदेत मांडली.

गावोगावी पोलीस पाटील याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे त्याला 24 तास गावातून बाहेर जाता येत नाही. गावात कायदा व सुरक्षितता आणि शांतता पसरवण्याचे काम पोलीस पाटीलला करावे लागते. गावातील आपापसातील भांडणे मिटवणे, तंटामुक्त गावासाठी प्रयत्न करणे, बलात्कार, खून, बालविवाह अशा प्रकारच्या गुन्ह्यांची ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणे, यांसारखी धावपळीची कामे करणार्याो पोलीस पाटीलला अवघ्या 3000 रुपये इतक्याच मासिक वेतनावर राबून घेतले जात आहे, असेही या संघटनेने आपले म्हणणे मांडले.

बेमुदत आंदोलन छेडणार
सदर मागण्यांसाठी संघ मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन करणार आहेत. लवकरात लवकर मागण्यांची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नाही, तर महाराष्ट्रातील सर्व पोलीस पाटील बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा संघाने दिला आहे.

संघाच्या मागण्या
वाढत्या महागाईचा विचार करता दरमहा 10,000 मानधन देण्यात यावे.
रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत.
सेवानिवृतीनंतर पोलीस पाटलांना मासिक निवृत्ती वेतन देण्यात यावे.
पोलीस पाटील कल्याण निधी निर्माण करण्यात यावा.
पोलीस पाटील पदावर नियुक्त करताना त्यांच्या वारसांना प्राधान्य देण्यात यावे.
प्रवास भत्ता देण्यात यावा.
प्रत्येक गावातील ग्रामपंचायत शेजारी पोलीस पाटलांच्या कार्यालयास जागा उपलब्ध करून देण्यात यावी.