अवजड वाहतुकीमुळे मोरी खचली

0

म्हसळा : दिघी पोर्टच्या बेकायदेशीर अवजड वाहतुकीमुळे म्हसळा दिघी राज्यमार्गावर असणार्‍या मोरीच्या खालचा भाग कोसळला आहे. वेळीच या मोरीकडे लक्ष न दिल्यास एखादा मोठा अपघात होण्च्याची शक्यता तोंड्सुरे ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. दिघी पोर्ट विकासाचे माध्यम की भकासाचे हे नागरिकांना समजण्या आधीच दिघी पोर्टमुळे म्हसळा सहित आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिघी पोर्टमधून होणार्‍या बेकायदेशीर अवजड वाहतुकीमुळे राज्यमार्गावरील रस्त्यावर तलावाएवढे मोठे खड्डे पडले असतानाच म्हसळा तालुक्यातील मौजे तोंड्सुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्‍या तसेच राज्यमार्गाच्या मध्यभागी असणार्‍या मोरीला खालून भगदाड पडले आहे.

दिघी पोर्टमधून होतेय अवजड वाहतूक
म्हसळा-दिघी मार्गावरून दिघी पोर्ट मधून तीनशे ट्रेले बेकायदेशीरपणे दिवसअखेरीस जातात. रस्त्याच्या क्षमते पेक्षा या ट्रेल्यांचे वजन चौपट प्रमाणात असतानाही ह्या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही. परिणामी श्रीवर्धन-म्हसळा-माणगाव तालुक्यातील अनेक छोटे मोठे पूल, छोट्या मोरी जीर्ण अवस्थते आले आहेत. तोंड्सुरे येथील मोरी शासनाच्या हलगर्जीपणामुळे शेवटचा घटका मोजत असून मोरी तुटल्यास म्हसळा बोर्ली मार्ग बंद होऊन अनेक गावांचा म्हसळा शहरासोबत संपर्क तुटणार आहे.

बेकायदेशीर वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी स्थानिक प्रशासनाची राहील. अपघात टाळण्यासाठी दिघी पोर्टने स्वताचे रस्ते निर्माण केल्यानंतरच अवजड वाहतूक करावी.
– रवी मुंढे,जिल्हाप्रमुख शिवसेना.

दिवसभर रिक्षा चालवल्यानंतर आमच्या घराची चूल पेटते, तोंड्सुरे येथल मोरी तुटल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.
– प्रशांत महाडिक,रिक्षा चालक तोंड्सुरे