अवजड वाहतूक ठरतेय डोकेदुखी

0

भुसावळ। शहरात वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. दुसरीकडे वाहनधारक सर्रास नियमांना पायदळी तुडवित असताना, वाहतूक पोलीस मात्र दंडात्मक कारवाई करण्यात गर्क असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांची नजर कमजोर झाल्याचा सूरदेखील शहरातील सुज्ञ नागरिकांमधून उमटत आहे. वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा वाहतुकीच्या नियमनाकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष पुरवायला हवे. नियमांची माहिती द्यावी. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी किंवा साहित्य वाहून नेणारी वाहने, दुचाकीवर मोबाइलचा वापर करणार्‍यांवर कारवाईने चालणार नाही, तर त्यांना नियमांविषयी अवगत करणे गरजेचे आहे. शहरांतर्गत रस्त्यांवर साध्या तीनचाकी, चारचाकी वाहनांमधून क्षमता नसतानाही अवजड साहित्यांची सर्रास वाहतूक केली जात आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन होईना
तीनचाकी रिक्षांमधून लोखंडी गज, लोखंडी अँगल, पाइप यांची वाहतूक करणे हा प्रकार तर नित्याचाच झाला आहे. रस्त्यांवरील लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, कुठलीही अपघाताची घटना वाहनधारकांच्या जिवावर बेतू नये, यासाठी शासनाने अनेक नियम लादून दिले आहेत. मात्र त्याचे पालन करण्याची कुणालाच गरज वाटत नाही.

अपघातांना दिले जाते निमंत्रण
सध्या शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवरून क्षमता नसतानाही अवजड साहित्यांची वाहतूक करणारी वाहने नेहमीच धावताना दिसून येतात. यासंदर्भात पाहणी केली असता, साधी चारचाकी वाहनांमध्ये आतमध्ये प्रवासी बसले असताना, टपावर विविध जड साहित्य ठेवण्यात आल्याचे आढळून आले. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक शहरातील बाजारपेठेत पाहणी केली असता तीनचाकी रिक्षावर 100 किलोपेक्षा अधिक वजनाच्या ‘अँगल’ची वाहतूक होतानाही यावेळी आढळून आले. अनेक दुचाकीचालक मोबाइलवर संभाषण करताना आढळून आले. यामुळे मोबाईलवर बोलताना समोरच्या वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे यातूनच अपघात होत असतात. यावरून नागरिक स्वत:च अपघातांना आमंत्रण देत असल्याचे सिद्ध होत आहे.

व्यापक मोहिम राबवावी
शहरात नियमबाह्य वाहतूक करणार्‍या वाहनधारकांवर दैनंदिन धडक कारवाई केली जाते. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणार्‍या वाहनांचाही यात समावेश आहे. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या ठराविक रकमेचा दंड आकारल्यानंतरही हा प्रकार संपुष्टात येत नाही. तरी देखील नागरिक या निमयांकडे दुर्लक्ष होत असून सर्रासपणे अशा प्रकारे जीवघेणी वाहतुक केली जात आहे. अशा स्वरूपातील हा जीवघेणा प्रकार थांबवायचा असेल, तर नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने पुढे यायला हवे. धोकादायक ठरेल अशी वाहतूक केल्यास प्रसंगी जीव धोक्यात सापडतो, ही बाब लक्षात घ्यायला हवी. यासाठी शहर वाहतुक नियंत्रण शाखेतर्फे सुध्दा व्यापक स्वरुपात मोहिम राबविण्याची आवश्यकता आहे.