अवजड वाहनांमुळे खेड तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

0

खडे । अवजड वाहनांमुळे खेड तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

खेड तालुक्यात खडी व वाळूच्या खाणी आहेत. येथील माल खाणमालक तालुक्यात तसेच पुणे, पिंपंरी-चिंचवड येथे विक्रीसाठी नेतात. ट्रकमध्ये किती भार न्यावा, याचा आरटीओने त्यांना नियम घालून दिला आहे. मोठ्या हायवा ट्रकसाठी 22 तर ट्रकसाठी 16 टन मालवाहतुकीला परवानगी दिली आहे. परंतु, प्रत्यक्षात खाण मालक हायवा ट्रकमधून 40 तर ट्रकमधून 20 टन मालाची वाहतूक करतात. सर्व खाणी ग्रामीण भागात आहेत. महामार्गापासून त्यांनी जोडणारे रस्ते कमी क्षमतेचे असल्याने जास्त वजनाच्या वाहनांमुळे ते खराब झाले आहेत.

खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थांचे हाल
सध्या पावसाळ्यात या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. खाण मालकांच्या त्रासाला कंटाळून गुळाणी परिसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावरून काही काळ खाण बंद ठेवण्यात आल्या होत्या. खाणींमुळे रस्ते खराब होत असल्याची बाब नागरिकांनी उपविभागीय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक हा विषय आरटीओचा असल्याने आम्ही काही करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. आरटीओ अशा वाहनांबाबत काहीच कारवाई करत नाही.