अवजड वाहने सोडण्यासाठी पाचशे रुपयांची लाच : आमदार मंगेश चव्हाणांचे स्टींग जिल्ह्यात ठरले चर्चेचा विषय
लाचखोरांवर कारवाईची अपेक्षा : आमदारांकडून ट्रक सोडण्यासाठी मागितले पाचशे रुपये
चाळीसगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी औट्रम घाटात पोलिसांकडून अवैधरीत्या होणार्या वसुलीचा स्टींगद्वारे पर्दाफाश केल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. अवैधरीत्या वसुली करणार्या पोलिसांवर आता जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय कारवाई करतात? व घाटाता आता वसुली थांबणार का? याकडे सुज्ञ जनतेचे आता लक्ष लागले आहे.
आमदारांना केली अरेरावी !
चाळीसगाव-कन्नड मार्गावरील औट्रम घाटात पोलिसांकडून सुरू असलेल्या अवैध वसुलीबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टींग केले. यासाठी आमदार स्वतःच ट्रक चालक बनले. वसुलीसाठी गाडी थांबवलेल्या झिरो पोलिसाला त्यांनी 500 रुपये देऊन बाकीचे पैसे परत मागितले. बाकी पैसे परत देणार नसल्याचे सांगत त्याने आमदारांना अरेरावी केल्यावर आमदारांनीही मग आपला इंगा दाखवला ! हे असे घडत असताना गस्तीसाठी नेमलेले आणि आमदारांना ओळखणारे पोलीस दोन मिनिटात घटनास्थळावरून अक्षरशः धूम ठोकत पळाले. सोशल मीडियावर या घटनाक्रमाचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीस दलाची प्रतिमा डागाळली आहे. लाचखोर पोलिसांवर आता जिल्हा पोलीस अधीक्षक नेमकी काय कारवाई करतात ? व अवैध वसुलीला आता पायबंद लागणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
घाट बंद असतानाच पैसे घेवून वाहनांना एंट्री
अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. याची खातरजमा करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी वेषांतर करत गुरूवारी रात्री दोन वाजता स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला. तेथे पोलिसांनी त्यांच्याकडे 500 रुपयांची मागणी केली त्यांनी थोडे कमी करा अस सांगत 500 रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले त्या पोलिसाने ते देण्यास नकार दिला आणि अरेरावीची भाषा आमदारांना सुनावली !
आमदारांना ओळखताच काढला पळ
त्यानंतर ट्रक चालक बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला ! मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांनी पळ काढला.
कारवाईकडे लागले लक्ष
या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद आहे मात्र पोलिसांकडून 500 ते 1000 रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येत असल्याने पोलीस प्रशासन लाचखोरांवर काय कारवाई करते? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे शिवाय कन्नड घाटातील अवैध वसुलीला पायबंद कायमस्वरूपी घालण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.