धुळे । रानमळा, ता. धुळे येथील तलावातून अवधान गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. अवधान फाटा ते मनुदेवी मंदीर पर्यंतचा रस्ता भूमिपूजनाचा कार्यक्रम ना.भुसे यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, अपर तहसिलदार ज्योती देवरे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, हिलाल माळी, सरपंच सुरेश भदाणे, उपसरपंच शालीग्राम सोनवणे, सतीश महाले, हेमंत साळुंखे उपस्थित होते. पालकमंत्री भुसे म्हणाले, अवधान फाटा ते मनुदेवी मंदिरापर्यंतच्या रस्ता डांबरीकरणासाठी 85 लक्ष 38 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा रस्ता 7 मीटर इतका रुंदीचा असणार आहे. रस्त्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असले पाहिजे. अवधान गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला जाईल. यावेळी प्रा. पाटील, रवींद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. मोरे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करुन आभार मानले.