अवनीच्या मृत्यूने कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही-मुख्यमंत्री

0

मुंबई : १३ जणांना ठार करणारी अवनी (टी-१ ) या वाघिणीला गोळी घालून ठार मारल्याप्रकरणी देशभरात सरकारविषयी संतापाची लाट उसळली आहे. यावरून वनमंत्र्यांवर टीकेची झोड उठलेली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघिणीचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे.

वाघिणीच्या मृत्यूवरून कोणालाही आनंद होण्याचे कारण नाही. उलट दु:खच आहे. तिच्या मृत्यूबाबत आता काहीजण आक्षेप नोंदवत आहेत. मात्र, वाघिणीने हल्ला केल्यानंतर बचावासाठी झालेल्या गोळीबारात ती मारली गेली असेही कारण पुढे आले आहे. आधी तिला बेशुद्ध करून पकडावे व नंतर तिचे पुनर्वसन करावे असा नियम आहे. पण त्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते तपासून बघावे लागेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी काही आक्षेप घेतले आहेत. त्या सुरुवातीपासूनच प्राणीप्रेमी आहेत. अनेकदा त्या मला यासंदर्भात फोन करत असतात. प्राण्यांबाबतचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत त्या माझ्याकडे पाठपुरावा करत असतात. त्यांनी तीव्र शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत, असे फडणवीस यांनी सांगितले.