वंचित विकासतर्फे ’अवयवदान प्रसार अभियाना’चा समारोप
पुणे : आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी. त्यासाठी अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित विकास संस्थेचे संस्थापक डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले.
वंचित विकास, शिरीष हरी कुर्लेकर चॅरिटेबल ट्रस्ट व हॅन्डरायटिंग ऍनालिसिस रिसर्च फाउंडेशन या संस्थेच्या वतीने 10 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान प्रसार अभियानाचा समारोप डॉ. चाफेकर यांच्या उपस्थित सारसबाग गणपती मंदिराच्या परिसरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अभियानाचे प्रमुख डॉ. मधुसूदन घाणेकर, वंचित विकासच्या मीनाताई कुर्लेकर, सुनीताताई जोगळेकर डॉ. सुधीर कुलाल, विजय दामले यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीनाताई कुर्लेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुधीर कुलाल यांनी आभार मानले.
अनेकांना नव्याने आयुष्य जगता येईल
डॉ. चाफेकर म्हणाले, ग्रॅफॉलॉजिच्या माध्यमातून अवयवदान प्रसार हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. गेल्या 10 दिवसात सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तास डॉ. घाणेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी पुण्याच्या विविध भागात फिरून भेटेल त्याला अवयवदानाचे महत्व सांगत होते. हजारो लोकांपर्यंत त्यांनी ’अवयवदान श्रेष्ठदान’ हा संदेश पोहोचवला आहे. अवयदानाचा प्रत्येकाने विचार केला तर अनेकांना नव्याने आयुष्य जगात येईल, शिवाय आपले अस्तित्व इतरांच्या रूपाने कायम राहील.
वारसांचा सन्मान केला पाहिजे
डॉ. मधुसूदन घाणेकर म्हणाले, अवयवदानाबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी प्रसार होणे गरजेचे आहे. या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी अवयवदानात योगदान दिले आहे, अशा व्यक्तींच्या वारसांचा सन्मान केला पाहिजे. येत्या काळात याबाबत परिषद भरवून त्याला व्यापक रूप देण्याचा प्रयत्न आहे. दहा दिवसांच्या या प्रवासात शहराच्या विविध भागात जवळपास 100 ठिकाणांना भेट देऊन तेथे भेटणार्या प्रत्येकाला याबाबत सांगितले आहे.