जळगाव । अवयवदानाबाबत समाजात बरीच जागृती होत असून समज – गैरसमज, रूढी यांना फाटा देत अनेक जण आता अवयवदानास पुढे येऊन अनेकांचे प्राण वाचवीत आहेत. याचा अजून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील आघाडीचे वोक्हार्ट हॉस्पिटलने एक पाउल पुढे टाकत अवयवदान दिनाच्या निमित्ताने हेल्प लाईनचा शुभारंभ केला. आज झालेल्या एका कार्यक्रमात मृत्युपश्चात अवयवदान केलेल्या व्यक्तींचे नातेवाईक तसेच जिवंत अवयव दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला आपल्या प्रास्तविकात डॉ. सचिन माने यांनी यामागची भूमिका विशद करतांना अवयवदात्यांमुळेच गरजूंना जीवनदान मिळाल्याचे नमूद केले.
वोक्हार्ट मध्ये आजपावेतो मृत्युपश्चात 7 अवयव प्रत्यारोपण
याप्रसंगी बोलतांना वोक्हार्टचे किडनी प्रत्यारोपणतज्ञ डॉ.नागेश अघोर म्हणाले कि, अवयव दानाबाबतची जागृती समाजात वाढत असून याकारीता माध्यमांचा मोठा वाटा आहे. अनेकांच्या मनात अवयवदानाबाबत अनेक प्रश्न असतात त्यामुळे त्यांच्या शंकांचे तज्ञांकडून निरसन करण्याकरिता 8600959444 हि मोफत हेल्प लाईन वोक्हार्टतर्फे सुरु करण्यात आली आहे. वोक्हार्ट मध्ये आजपावेतो मृत्युपश्चात 7 अवयव प्रत्यारोपण तर जिवंतपणी सुमारे 30 किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत असेही ते म्हणाले. मेंदू मृत झाल्यामुळे मृत्यू आला तर हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, स्वादुपिंड, आतडी, फुफ्फुसे वगैरे दान करू शकतो तथापी डोळे, त्वचा या हृदय विकाराने मृत्यू झाला तरच दान करता येते. जिवंत व्यक्ती मूत्रपिंड (कारण आपल्याला 2 मूत्रपिंडे असतात) किंवा यकृताचा भाग आपल्या जवळच्या व्यक्तीला दान करू शकतो अशी माहितीही त्यांनी दिली.
सर्व सुविधा वाजवी दरात
अवयव प्रत्यारोपणास हॉस्पिटल, सरकारी यंत्रणा व पोलीस प्रशासन तसेच शासनाचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे अशी माहिती देतांना केंद्रप्रमुख विनोद सावंतवाडकर म्हणाले की, प्रत्यारोपण करण्यासाठी लागणार्या सर्व अद्ययावत सुविधा, तज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली तसेच वाजवी दारात उपलब्ध आहेत. कार्यक्रमाला अनेक अवयवदाते, वोक्हार्टचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.