अवयवदानाच्या माध्यमातून प्रत्येकाने सामाजिक संवेदनशीलता जोपासावी

0

* चाळीसगाव येथे डॉ.सुनिल राजपुत यांचे प्रतिपादन
* ‘जागर अवयव दातृत्वाचा’ संकल्पपूर्तीपर मार्गदर्शन शिबीर
* युगंधरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आयोजन
* 21 दातृत्व महिलांचा करण्यात आला यथोचित सत्कार

चाळीसगाव । जागतिक अवयवदान दिवसाचे औचित्य साधून स्वातंत्र्य दिनी पोलिस कवायत मैदानावर युगंधरा फाउंडेशनच्या वतीने ‘जागर अवयव दातृत्वाचा’ या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल अस्थिरोग तज्ञ डॉ.सुनील राजपुत, स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ.उज्ज्वला देवरे, इनरव्हिलच्या अध्यक्षा दिपाली राणा, शैला छाजेड, रंजना मानकर, प्रियंका शिरसाठ, जिजाऊ महिला संघटनेच्या अध्यक्षा मनीषा पाटील इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व गाण्यांवर नृत्ये सादर केलीत यावेळी सहभागी विद्यार्थांना प्रशस्तीपत्र देण्यात आले तर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यातील नगांव गावास तालुकास्तरीय प्रथम मानांकन मिळाले असून यात श्रमदान केलेल्या महिलांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येवून त्यांच्या सामाजिक कार्याची मान्यवरांनी प्रशंसा केली.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
एखाद्या अपघातात व्यक्तीच्या मेंदूला गंभीर स्वरुपाचा मार लागल्यानंतर, मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर किंवा एखाद्या आजारामध्ये मेंदू निकामी झाल्यानंतर संबंधित व्यक्तीस ‘ब्रेन डेड’ (मृत मेंदू) असे म्हटले जाते अशी व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकत नाही, अशा स्थितीत त्या व्यक्तीच्या शरीरातील मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुस, यकृत,त्वचा आतडे आदी अवयव चांगल्या स्थितीत कार्यरत असल्याने या अवयवांचे गरजू जिवंत रुग्णांवर योग्य वेळेत प्रत्यारोपण होऊ शकते असे डॉ.उज्ज्वला देवरे यांनी सांगितले. अवयवदान ही काळाची गरज असून याबाबत जागृती देखील तितकीच महत्वाची आहे.अवयवदाते मिळत नसल्याने भारतात दरवर्षी लाखो रुग्णांचा मृत्यू होतो,आजही अवयवांच्या प्रतिक्षेत अनेक रुग्ण मृत्यूशी झुंजत आहेत,व्यक्तीच्या मृत्यूनंतर यकृत, मूत्रपिंड, हृदय, आतडे, डोळे, त्वचा आदी दान करून दुसर्‍याला जीवदान देऊ शकतो. अवयवदानासाठी अधिकाधिक व्यक्तींनी पुढे आल्यास हजारोंचे प्राण वाचतील, अवयवदान करून मृत्यूनंतरही आपण दुसर्‍याच्या रुपाने जीवंत राहू शकतो.त्यामुळे गैरसमज आणि अंधश्रद्धा बाजूला ठेऊन सर्वांनी अवयवदान चळवळीत सहभागी व्हावे, असे सांगत स्मिता बच्छाव यांनी कार्यक्रमाची माहीती विशद केली.

यांची होती उपस्थिती
स्मिता बच्छाव, लता जाधव, राखी संगेले, प्राजक्ता पाटील, मालती बच्छाव, जयश्री जगताप, योगिता पाटील, दिपाली शिंपी, यामिनी पाटील, उषा पाटील, पुष्पा बडगुजर आदी महिलांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करीत वसुंधरा फाउंडेशनकडे आपले फॉर्म सुपुर्द करीत अभियानास एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पवार व सहकार्‍यांच्या माध्यमातून अवयवदान संकल्प सुरु असून त्यासाठी इच्छूकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती तर खुमासदार शैलीत कामिनी अमृतकर यांनी प्रास्ताविकतेतून अवयवदानाचे महत्व पटवून देत सुत्रसंचालनातून अनोख्या सामाजिक उपक्रमांची ही यशस्वी नांदी असल्याचे सांगितले तर आभार स्वप्नील कोतकर यांनी मानले.