पुणे । कर्नाटकच्या बिदर जिल्ह्याच्या एकवीस वर्षांच्या ब्रेन डेड युवकाने हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंड हे चार अवयव दान केल्याने पुण्यातील चौघांना नवीन जीवन मिळाले आहे. हृदय हे रुबी हॉलमधील मूळच्या भारतीय पण सध्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या 67 वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले आहे.
21 वर्षांचा हा युवक बिदरच्या बसवकल्याण तालुक्यातील रहिवाशी होता. त्याचा 11 सप्टेंबरला रस्त्यावर अपघात झाला होता. प्रथम त्याला उपचारासाठी तेथील शासकीय रुग्णालयात आणि नंतर सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी बुधवारी पहाटे त्याला सोलापूरच्या डॉ. वैैशंपायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्याची तपासणी केली असता तो ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या रुग्णालयात प्रथमच ब्रेनडेड रुग्णाचे अवयव काढण्याची प्रक्रिया पार पडली. समितीकडे असलेल्या वेटिंगवरील रुग्णांच्या यादीनुसार युवकाचे हृदय आणि यकृत हे रुबी हॉल क्लिनिक येथील दोन रुग्णांना देण्याचे ठरले. तर एक मूत्रपिंड हे पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालय तर दुसरे मूत्रपिंड हडपसरच्या नोबेल रुग्णालयातील रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात येणार असल्याची माहिती पुणे झेडटीसीसीच्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
सोलापूरवरून हृदय आणि यकृत घेऊन निघालेले खासगी विमान हे 253 किलोमीटर अंतर केवळ 55 मिनिटांत पार करत पुण्यात पोचले. डॉक्टरांनी त्या युवकाचे हृदय, यकृत काढली आणि ते अवयवव घेऊन विमान सोलापूरवरून 1 वाजून 15 मिनिटांनी निघाले होते. ते लोहगाव विमानतळावर 2 वाजून 10 मिनिटांनी पोचले. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरद्वारे हे दोन्ही अवयव केवळ सातच मिनिटांत रुबी हॉल क्लिनिक येथे पोचले, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे यांनी दिली. सोलापूर येथील डॉ. वैशंपायन शासकीय रुग्णालयातील मूत्रपिंड विकार तज्ज्ञ डॉ. संदीप होळकर यांनी ही माहिती दिली.