मुंबई। देशभरात अवयवदानाच्या चळवळीला मोठ्या प्रमाणावर गती दिली जात आहे. मात्र जनजागृती करून देखील अनेक रुग्णांना अवयव मिळत नसल्याचे वास्तव आहे. एखादा अवयव नसल्याने जीव गमवावा लागत असलेल्या हजारो रुग्णांसाठी ही चळवळ व्यापक होणे आवश्यक आहे. यासाठी देशभरात प्रयत्न केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर असून राज्यसरकारने यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. देशात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अवयवदानाचा ठराव मांडला जाणार आहे. प्रत्येक गावात एकाचवेळी हा ठराव होणार असल्याची माहिती आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यासंबंधी शासन आदेश देखील काढले गेले आहेत.
हे सरकार आल्यापासून अलीकडील 2 वर्षात अवयवदान मोहिमेचा प्रचार प्रसार वाढला आहे. आता आपण देशात 6 व्या वरून 2 क्रमांकावर आलो आहोत. मात्र आम्ही समाधानकारक नाहीत, कारण ही मोहीम व्यापक होणे आवश्यक आहे. अवयव नसल्याने अनेकांना वाट पहावी लागतेय. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवायचे आहेत. यासाठी लोकांमध्ये जागृती होने आवश्यक आहे. माणूस मृत झाल्यांनातर अनेकांना जीवनदान मिळू शकते त्यामुळे अवयवदान करणे आवश्यक आहे. आधी याबाबत नागरी भागात मोठ्या प्रमाणावर जागृती झाली आहे, मात्र आता प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे.
गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री
दोन दिवसांची विशेष मोहीम
महाअवयवदान महोत्सवानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 29 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी. यामध्ये अवयवदान प्रचाराचा ठराव आणि अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्याचे आदेश दिले आहेत. तर 30 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरासमोर अवयवदानाच्या प्रचारासाठी रांगोळी काढून जनजागृती करण्याचे सांगितले आहे. प्रत्येक गावातील ठराव तहसीलदारांकडे देणार असून ते जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहेत. प्रत्येक घटकांपर्यंत अवयवदानाविषयी जनजागृती व्हावी हाच प्रमुख उद्देश असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
सरकारी रुग्णालयात अनास्था
अवयवदानाविषयी राज्यसरकारकडून एकीकडे मोठ्या प्रमाणावर सकारात्मक पाऊल उचलले जात असताना दुसरीकडे सरकारी हॉस्पिटलमध्ये मात्र याविषयी अनास्था असल्याचे चित्र आहे. सध्या राज्यात सरकारी पेक्षा खाजगी रुग्णालयात अधिक अवयवदान होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिक प्रमाणात रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात. त्यामुळे अवयवदानाविषयी समुपदेशन करण्यासाठी समुपदेशक नेमण्याची आवश्यकता आहे. सध्या राज्यात किडनीसाठी 12000 रुग्ण वेटिंग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशाच प्रकारे अनेक अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जागृती गरजेचे आहे.