जळगाव । मधील ‘अवर ब्लड ग्रुप’च्या माध्यमातून युवकांचा जन्मदिवस रक्तपेढीत साजरा करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. दि. 1 जानेवारी रोजी मांगीलालजी बाफना नेत्रपेढीचे संचालक सचिन चोरडिया आणि प्रकाश चव्हाण यांचा जन्मदिवस माधवराव गोळवलकर रक्तपेढीत साजरा करण्यात आला. यावेळी जमलेला मित्र परिवार आणि नातेवाईकांनी रक्तदान करून समाजहिताची भेट दिल्याची भावना व्यक्त केली. अवर ब्लड ग्रुपच्या वतीने रक्तदात्यांना दर तीन महिन्यांनी रक्तदानाची प्रेरणा मिळावी म्हणून स्मृती चिन्ह भेट देण्यात आले.
दोन वर्षात 535 रक्तदात्यांना प्रोत्साहन
मागील 2 वर्षांपासून जळगाव तसेच महाराष्ट्रात रक्तदान चळवळ रुजावी म्हणून अवर ब्लड ग्रुपची निर्मिती झाली असून सोशल मीडिया आणि वेबसाईटच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यात ग्रुपला यश मिळाले आहे. मागील वर्षी स्थापन झालेल्या वेबसाईटला 5000च्या वर व्हिजिटर आहेत. तर दोन वर्षांपासून रक्तदात्यांना प्रोत्साहित करीत 535 रक्तदात्यांच्या माध्यमातून 300 च्या वर गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून दिले आहे. यासाठी अनेक रक्तपेढ्यांचे सहकार्य मिळत आहे. रक्तदानाची प्रेरणा आपल्या मुलांनाही मिळावी म्हणून सचिन चोरडिया यांनी प्रथम आणि निव या दोन्ही मुलांना रक्तपेढीच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी सुशिलाबाई चव्हाण, आरती चव्हाण, योगेश सूर्यवंशी, मनोज पाटील, निलेश चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, योगेश ठाकूर, धनराज चव्हाण उपस्थित होते.