अवाढव्य उरण तालुक्यात अवघे 1454 पदवीधर मतदार!

0

उरण । तीन वरिष्ठ महाविद्यालयांच्या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे पाचशे विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडणार्‍या उरण तालुक्यात पदवीधर मतदारांची संख्या केवळ 1454 एवढीच असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ज्या प्रमाणात या मतदारांची नोंदणी व्हायला पाहिजे ती झालीच नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे. तालुक्याचा विचार करता तालुक्यातील वीर वाजेकर वरिष्ठ महाविद्यालयातून 1992 ला पदवीधरांची पहिली तुकडी बाहेर पडली त्यापाठोपाठ कोकण ज्ञानपीठ विद्यालय आणि त्यानंतर यूईएसनेदेखील वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले आहे. या सर्व विद्यालयांतून आत्तापर्यंत पदवी घेऊन बाहेर पडलेल्या पदवीधरांची संख्या सुमारे साडेचार ते पाच हजारांपर्यंत पोहोचत असताना प्रत्यक्षात पदवीधर मतदारयादीत मात्र तालुकाभरातून अवघ्या 1454 मतदारांचीच नोंदणी असल्याने उरण तालुक्यात पदवीधरांची मतदार नोंदणी करण्यात प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आदी सपशेल फेल ठरल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. विशेष म्हणजे इतर मतदार नोंदणीप्रमाणे पदवीधरांची मतदार नोंदणी घरोघरी जाऊन करण्याचे कधी प्रयत्नच झालेले नसल्याचे ही यानिमित्ताने समोर आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी केवळ तहसील कार्यालयात येऊन पदवीधरांनी आपले मतदारयादीत नाव नोंदवावे, असे आवाहन करत असले, तरीही प्रत्यक्ष पदवी प्राप्त झाल्यावर पदवीधरांवर पडलेला नोकरी-व्यवसायायाचा व्याप, संसाराचा गाडा आदी कारणांमुळे हजारो पदवीधर आजही पदवीधर मतदार या आपल्या हक्कापासून कोसो दूरच असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. याकरिता गावोगावी कार्यकर्त्यांचे मेळावे, जाहीरसभा आदींचा धुमधडाका जोरात सुरू आहे. मात्र, कोकण पदवीधर मतदारसंघात मोडणार्‍या उरण तालुक्यात पदवीधर मतदार किती याचा आलेख समजून घेण्याचा प्रयत्न केला असता अवघे 1454 मतदार आजच्या तारखेला या ठिकाणी नोंदले गेले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दरवर्षी शेकड्यांच्या प्रमाणात होणारे पदवीधर विद्यार्थी मतदार गेले कुठे, असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे. उरण तालुक्यात तीन वरिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये वीर वाजेकर कॉलेज हे सर्वात मोठे आहे.

पदवीधर मतदारांचा आकडा पाच हजारांच्या वर केव्हाच जायला पाहिजे होता
या एकट्या महाविद्यालयातून आजच्या घडीला सुमारे विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन विभागातून मिळून सरासरी सुमारे 250 विद्यार्थी दरवर्षि पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. हाच आकडा इतर दोन वरिष्ठ महाविद्यालये पकडून वर्षाकाठी सुमारे सरासरी 500 पदवीधर बाहेर पडत आहेत. त्यामुळेच पदवीधर मतदारांचा आकडा किमान पाच हजारांच्या वर केंव्हाच जायला पाहिजे होता. मात्र, दुर्दैवाने तसे झालेले नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. तालुक्यात अगदी घरोघरी जाऊन पदवीधरांचा सर्व्हे झाल्यास हा आकडा सुमारे सात हजारांपर्यंत ही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर केवळ वरिष्ठांनी सांगितलंय म्हणून पदवीधर मतदार संघाच्या उरण तालुक्यात बेंबीच्या देठापासून ओरडणार्‍या राजकीय मंडळींचे पदवीधर मतदारांच्या नोंदणीकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. त्यातच तरुणाईत राजकारणाबाबत असलेला तिटकारा आणि कामांचा असलेला गरांडा आदी पाहता तरुणाईदेखील पदवीधर मतदारयादीत आपले नाव यावे यासाठी फारशी सतर्क राहिलेली नसल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

यासंदर्भात उरण तहसीलच्या निवडणूक शाखेचे अधिकारी मोहन सातपुते यांना विचारले असता मागील दोन वर्षात आम्ही सुमारे 1114 मतदारांची नोंद केली आहे. यापूर्वी हा आकडा खूप कमी होता. पदवीधर स्वतः: आपले नाव नोंदणीसाठी येण्याची संख्या वाढण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही कॉलेज च्या प्राचार्यापासून ते राजकीय व सामाजिक मंडळींचे सातत्याने बैठका घेऊन याबाबत जनजागरण करण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र, तालुक्यातून त्याला फारसा पदवीधरांकडून प्रतिसाद मिळत नाही हे सत्य असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले.