अविनाश भोसले, विश्वजित कदमांच्या कार्यालयांवर छापे

0

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचेच जावई व काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या निवासस्थानांसह कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी अचानक छापे टाकले. शहरात मोठ्या प्रमाणात जमविलेली मालमत्ता व काळा पैसा पांढरा केल्याच्या संशयावरून हे छापे पडल्याचा संशय असून, या कारवाईबाबत प्राप्तिकरच्या अधिकार्‍यांनी प्रचंड गोपनीयता पाळली आहे. कदम यांच्या भारती विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा असतानाच हे छापे पडले आहेत. दरम्यान, सूत्राच्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागले असून, भोसले व कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यात दिवसभर विविध कार्यालयांवर एकाचवेळी हे छापे सुरु होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आलेला होता.