पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकातील दवाखान्यात घडली घटना
सांगवी : पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या एका अविवाहित युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून, पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर अज्ञात तरुणांच्या टोळक्याने दवाखान्यात घुसून प्राणघातक हल्ला केला. या घटनेत टोळक्याने कोयत्याने वार केल्याने डॉक्टरच्या हाताच्या बोटांना आणि खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि. 9) रोजी रात्री दहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात असलेल्या सखी हॉस्पिटलमध्ये घडली. डॉ. अमोल अशोक बीडकर (वय 37, रा. पिंपळे गुरव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डॉक्टरांवर होणार्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या भ्याड हल्ल्याचा सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून, हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारे जोडपे
याबाबत सांगवी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात डॉ. अमोल बीडकर व डॉ. मानसी बीडकर यांचे सखी हॉस्पिटल नावाचे मॅटर्निटी रुग्णालय आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असलेले एक जोडपे काही दिवसांपूर्वी डॉ. अमोल बीडकर यांच्या रुग्णालयात आले होते. त्या जोडप्याने रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणीत युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉ. बीडकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तशी कल्पना त्या जोडप्यास दिली. नंतर त्यांनी गर्भपात करण्याची विनंती केली. मात्र, 12 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भ असेल तर कायद्याने गर्भपात करता येत नाही. ही युवती 20 आठवड्यांची गर्भवती असल्याने कायद्याने हा गर्भपात करता येणार नाही, असे सांगून डॉ. अमोल बीडकर यांनी गर्भपात करण्यास नकार दिला. त्यानंतर सदर अज्ञात तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत येऊन शनिवारी रात्री डॉ. बीडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
ओपीडी कक्षात झाला हल्ला
डॉ. अमोल बीडकर यांनी अविवाहित युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिल्याचा राग मनात ठेऊन त्या युवतीच्या प्रियकर आपल्या अन्य साथीदारांना सोबत घेऊन शनिवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास डॉ. बीडकर यांच्या सखी हॉस्पिटलमध्ये आला. त्यावेळी डॉ. बीडकर हे ओपीडी कक्षात होते. टोळक्याने त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना काही कळायच्या आत त्यांच्यावर हल्ला केला. झटापटीत टोळक्यातील एकाने त्यांच्यावर कोयत्याने वार करणार्या प्रयत्न केला. परंतु, डॉ. बीडकर यांनी बचावासाठी हात पुढे केल्याने कोयत्याचा वार त्यांच्या बोटांवर झाला. यावेळी त्यांच्या हातातील मोबाईल फोन फुटला. नंतर त्यांच्या खांद्यावरही वार करण्यात आला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी लागलीच रुग्णालयातून पळ काढला.
आरोपींच्या अटकेची मागणी
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल बीडकर यांच्यावर झालेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप ननावरे, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. सुनील पाटील यांच्यासह सर्व सदस्यांनी रविवारी सांगवी पोलीस ठाण्याजवळ येऊन या घटनेचा निषेध केला. आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. नंतर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर, मेडिकल संघटनेचे अध्यक्ष महेंद्र लंबाते आदींनी पोलीस ठाण्यात येऊन डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच सदर हल्लेखोरांवर कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी केली.
डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
डॉक्टरांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डॉक्टरांना कायद्याने संरक्षण दिले पाहिजे, डॉक्टरांवर हल्ला करणारे, मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.