अविश्वासावर ‘विश्वासाची’ कुरघोडी!

0

सरकारच्या मनमर्जीने कामकाज चालवत असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षाने १८ दिवसांपूर्वी विधानसभेच्या अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्याला प्रत्यूत्तर म्हणून फडणवीस सरकारने विरोधकांच्या अविश्वास ठरावावर कोणतीही चर्चा न करता उलट सभागृहात ‘विश्वास’ ठराव मांडला. होय चे बहुमत, होय चे बहुमत प्रस्ताव संमत झाला म्हणत आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूरही करून घेण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, इतर वेळी सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेनेही यावेळेला सरकारच्या विश्वास ठरावाला अनुमोदन दिले.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हेतूपुरस्सर वागत आणि पक्षपाती पध्दतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. विरोधकांना चांगलेच चेकमेट करत मुख्यमंत्र्यांनी बाजी मारली. विरोधकांना त्यांनीच मांडलेला प्रस्ताव चर्चेला येत असल्याचा भ्रम झाला. मात्र त्यावर कोणतीही चर्चा न पुकारता सदर प्रस्तावावर सत्ताधारी पक्षाकडून आवाजी मतदान घेत विश्वास दर्शक ठराव मंजूर करून घेत असल्याचे लक्षात येताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य उठून उभे राहून त्यास विरोध दर्शविण्याचा प्रयत्न करे पर्यंत तालिका अध्यक्षांनी विश्वास दर्शक ठराव मंजूर करून सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूबही केले. त्यामुळे विरोधकांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय राहीला नाही. तसेच विरोधकांकडून अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात आणण्यात आलेल्या प्रस्ताव सभागृहात येवूच न दिल्याने विरोधकांना तोंड दाबून बुक्याचा मार खावा लागला. तर मुख्यमंत्र्यांच्या या खेळीमुळे राज्य सरकारवर आलेले गडांतर लिलया परतवून लावले.

या विरोधकांनी हरकत घेऊन गोंधळ करायला सुरुवात केल्यावर मुख्यमंत्र्यांनी अगदी चवताळून नेहमीच्या शैलीत हे पहिल्यांदाच घडत नसल्याचे उदाहरणासहित सांगितले. काँग्रेसच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडला होता आणि तो मंजूर केला होता. नियमानुसार कामकाज झाले असल्याचे सांगत आता विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आपला ‘विश्वास’ ठराव रेटून धरला. त्यानंतर विधानसभेचे कामकाज मात्र गुंडाळावे. यावेळी सत्ताधाऱ्यांचाच गोंधळ पाहण्याजोगा होता. खरतर विश्वासदर्शक ठराव मांडल्यावर सभागृह कामकाज तहकूब का केले? असा प्रश्न आहे. सरकारची स्टेटर्जी स्पष्ट दिसतेय. आता विरोधक यावर काय आणि कशी भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. सोमवारी आता यावर गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जाता-जाता:- मंत्रालयात आत्महत्या करण्याचे प्रकार अधिवेशन काळातही सुरूच आहेत. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गुलाब मारुति शिंगारी या ५६ वर्षीय शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही सरकारी धोरणाविरुद्धची आग कधी थांबणार ‘देव’ जाणे.