पुणे । अनधिकृतरीत्या प्रवासी घेणार्या खासगी प्रवासी गाड्यांना 25 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महापालिकेच्या मुख्यसभेने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अनधिकृतरीत्या प्रवासी भरण्यास अटकाव होण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासगी प्रवासी गाड्यांसाठी अधिकृत थांबे जाहीर झाल्यानंतर दंडाच्या रकमेतही 10 हजार रुपयांनी वाढ होणार असून पदपथांवरील अतिक्रमणांसाठी दंड आकारण्यासही महापालिकेने मान्यता दिली आहे.
नियम मोडणारे वाहनचालक, अनधिकृत रीत्या होणारी प्रवासी वाहतूक, पदपथांवर अतिक्रमण करणारे पथारीवाले आदींकडून दंड आकारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. त्याला मुख्य सभेने एकमताने मान्यता दिली. बंदी घातलेल्या रस्त्यांवर पार्किंग केल्यास तसेच अवजड वाहनांनी वाहतूक केल्यास यापुढे 35 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. नादुरुस्त तसेच बंद पडलेल्या वाहनांनाही तेवढाच दंड आकारण्यात येणार असून हलकी वाहने, कार-जीप, सहा-तीन आसनी रिक्षा, दुचाकी यांच्यासाठी अनुक्रमे 20, 15, 10 आणि पाच हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.
खाद्यपदार्थाच्या गाडील 5 हजारांचा दंड
अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून केल्या जाणार्या दंडाच्या रकमेतही वाढ करण्यास मान्यता मिळाली आहे. अतिक्रमण विभागाला कारवाईसाठी प्रत्येक परिमंडळाला प्रतिदिन 60 हजार रुपयांचा खर्च येतो. पदपथांवर अतिक्रमण करणार्या व्यावसायिकांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून 500 रुपये दंडाच्या स्वरुपात वसूल केले जातात. मात्र परिमंडळाचा हा खर्च भरून निघत नाही. तसेच दंडाची रक्कम तुलनेने कमी असल्यामुळे पुन्हा अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. खाद्यपदार्थाच्या गाडीला आता पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बांधकाम पाडण्याच्या शुल्कातही मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या दंडाच्या रकमेला मान्यता देताना अधिकृत आणि अनधिकृत पथारीवाल्यांना समान दंड आकारण्यावरून मुख्य सभेत एकमत झाले नाही. अखेर जुन्या आणि नव्या अतिक्रमणांना समान दंड आकारण्यात यावा, अशी उपसूचना देऊन हा प्रस्ताव मान्य करण्यात आला.