अवैधरीत्या वाळू वाहतूक : दोन ट्रॅक्टर ट्रॉली जप्त

रावेर : निंभोरासीम येथील वाळू साठ्यावरुन अवैधरीत्या वाळू भरली जात असताना गावातील पोलिस पाटील यांनी दोन ट्रॉली जप्त करीत त्या रावेर तहसील कार्यालयात जमा केल्याने निंभोरासीम परीसरातील अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कारवाईत सातत्य राखण्याची मागणी
रावेर तालुक्यातील निंभोरासीम येथे वाळूचे मोठ्या प्रमाणावर साठे तयार करण्यात आले आहेत. या वाळू साठ्यावरून ाळू ट्रॉलीत भरली जात असताना गावातील स्थानिक पोलिस पाटलांनी निळ्या रंगाच्या दोन ट्रॉली जप्त केल्या. या ट्रॉली कोतवाल गणेश चौधरी यांनी ट्रॅक्टर लावून तहसील कार्यालयात जमा केल्या. निंभोरासीम परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतूक केली जाते याकडे स्थानिक महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीदेखील निंभोरासीम येथून निष्काळजी पणामुळे महसूलने जप्त केलेली सुमारे चारशे ब्रास अवैध वाळू चोरीला गेली होती. यामुळे महसूल प्रशासनाला लाखो रूपयांचा चुना लागला होता. ही कारवाई मंडळ अधिकारी विठोबा पाटील, तलाठी भाग्यश्री बर्वे, एन.आर.चौधरी, विनय शिरसाड, कोतवाल गणेश चौधरी, गोपाल बेलदार, प्रवीण धनके आदी महसूल कर्मचार्‍यांनी केली. मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असताना रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लक्ष देण्याची मागणी सुज्ञ जनतेतून होत आहे.