अवैध उत्खनन थांबता थांबेना

0

मुक्ताईनगर। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन सुरु असून चोरट्या मार्गाने वाहतुक केली जात आहे. तहसिलच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल यामुळे बुडत आहे. भोटा येथून मलकापूर तालुक्यातील हरसांडाकडे अवैध मुरुम वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुल विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले आणि पोलीस चौकीत लावले. मात्र शेकडो ट्रॉली मुरुम अवैधरित्या आधीच वाहतूक झालेली असून महसुलच्या हाती एकच ट्रॅक्टर लागल्यामुळे ही कारवाई केवळ फार्स ठरली आहे. मुक्ताईनगरचे नायब तहसिलदार डी.आर. नमायते यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी पी.एस. पाटील, तलाठी ए.एस. सरोदे, एन.डी. काळे, एम.पी. दाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करणारे एमएच 28 टी 4450 क्रमांकांचे ट्रॅक्टर त्यांनी पुर्णा नदीवरील पुलाजवळ पकडले. मात्र हि कारवाईत सातत्य राखणे गरजेचे आहे.

35 ट्रॅक्टरांनी केली बेसुमार मुरुम वाहतुक
ही कारवाई करुन महसुल विभाग आपली पाठ थोपटून घेत असला तरी प्रत्यक्षात ही कारवाई कुचकामी ठरणारी असल्याचे बोलले जात आहे. कारण अवैध गौणखनिज वाहतूक करणार्‍या सुमारे 35 ट्रॅक्टरांनी मागील आठवड्यापर्यंत बेसुमार मुरुम वाहतूक आधीच करुन टाकली आहे. या आठवड्यात सततच्या रिमझिम पावसामुळे जेसीबी व ट्रॅक्टरचालकांना मुरुम खोदून वाहतूक करणे जिकिरीचे झाल्यामुळे काही काळासाठी त्यांनी ही चोरी थांबविलेली आहे तर पकडलेले ट्रॅक्टरच्या सहाय्याने ढीग मांडून ठेवलेला मुरुम वाहतूक होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नदीकाठी टेहळणी
महसुलचे पथक अवैध रेती वाहतुकीविरुध्द कारवाईसाठी कोर्‍हाळा व धुपेश्‍वर येथील वाळुच्या धक्क्यावर गेल्याचे समजते. वास्तविक उन्हाळ्यात जेव्हा पुर्णा नदीचे पाणी कमी होते तेव्हा रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. आता पावसाळा सुरु होवून दोन महिने होत आलेले असतांना महसुलचे अधिकारी अवैध रेती विरोधात कारवाईसाठी पुर्णा नदीकाठी फिरत असल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात रेती उपसा बंद असतांना कारवाईसाठी फिरणे म्हणजे निव्वळ वरातीमागून घोडे नाचविण्याचाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

महसूल कर्मचार्‍यांचे साटेलोटे
तालुक्यातील कुर्‍हा व परिसरातील गावात आजही ठिकठिकाणी रेतीचे ढिग मांडून ठेवलेले असतांना महसुलच्या अधिकार्‍यांना ते दिसत नाहीत. मात्र ज्याठिकाणी हाती काहीच लागणार नाही अशा ठिकाणी कारवाईसाठी धडपड सुरु असल्याचे केविलवाणे चित्र आहे. तहसिलच्या दुर्लक्षितपणामुळे अवैध उत्खनन माफियांना उत आला असून यात स्थानिक पुढारी तसेच महसूल कर्मचार्‍यांचेही साटेलोटे असल्याचेही समजते.